Waghya Dog l छत्रपती शिवाजी महाराजांच्या रायगडावरील वाघ्या कुत्र्याच्या स्मारकावरून सध्या राज्यात मोठा वाद उफाळला आहे. छत्रपती घराण्याचे वंशज संभाजीराजे यांनी वाघ्या कुत्र्याचं स्मारक रायगडावरून हटवण्याची मागणी सरकारकडे केली असून, यावर आता संभाजी ब्रिगेड आक्रमक झाली आहे. त्यांनी थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना उद्देशून प्रश्न केला आहे की, “वाघ्या कुत्र्यावर बुलडोझर कधी चालवणार?”
संभाजी ब्रिगेडने हे स्मारक अतिक्रमण ठरवत त्याच्या तात्काळ हटवणीची मागणी केली आहे. त्यांच्या मते, वाघ्या कुत्र्याचा इतिहासात कुठेही ठोस उल्लेख नाही, आणि अशा खोट्या कथांवर आधारित पुतळा रायगडावर असणं हे इतिहासाला लागलेला कलंक आहे.
रायगडावरून अतिक्रमण हटवण्याची सुरुवात वाघ्या कुत्र्यापासूनच करावी – संभाजी ब्रिगेड :
संभाजी ब्रिगेडने सरकारकडे मागणी केली आहे की, राज्यातील सर्व गड-किल्ल्यांवरील अतिक्रमण हटवण्याची मोहिम रायगडावरून आणि वाघ्या कुत्र्याच्या पुतळ्यापासून सुरू करावी. त्यांनी स्पष्ट सांगितले की, “इतिहासाचे संदर्भ तपासून, या कथेमध्ये तथ्य नसल्यानं हा पुतळा सरकारने स्वतः हटवावा. ही तमाम शिवप्रेमींची इच्छा आहे.”
त्याचबरोबर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली बैठक घेऊन निर्णय घेण्यात यावा, असेही त्यांनी सुचवले आहे. अन्यथा, हा वाद अधिक तीव्र रूप घेऊ शकतो, असा इशाराही दिला गेला आहे.
Waghya Dog l “आग्या मोहोळ आहे संभाजी ब्रिगेड, विनाकारण डिवचू नका” :
या संपूर्ण वादावर भाष्य करताना संभाजी ब्रिगेडने सरकारवर आणि काही तथाकथित ‘सुपारी बहाद्दरांवर’ टीका केली आहे. “समर्थ ब्रिगेडवर जाणीवपूर्वक अपशब्द वापरणाऱ्या दलालांनी सावध रहावं. संभाजी ब्रिगेड हे आग्या मोहोळ आहे, विनाकारण डिवचू नका, अन्यथा उत्तर जशास तसे दिलं जाईल,” असा इशारा त्यांनी दिला.
त्यांनी व्यंगात्मक भाषेत म्हटलं की, “ज्यांना वाघ्या कुत्र्यावर खूप प्रेम आहे, त्यांनी तो आपल्या आजी-आजोबा, पंजोबाच्या समाधीशेजारी बसवावा. सिमेंट, विटा आणि वाळूचा खर्च आम्ही देऊ.”








