Vinayak Raut | शिवसेना (ठाकरे) पक्षाचे नेते आणि माजी खासदार विनायक राऊत यांच्या अडचणीत आणखी वाढ झाली आहे. त्यांच्या सून गिरीजा राऊत यांनी दाखल केलेल्या कौटुंबिक छळ आणि जादूटोणाविरोधी कायद्यांतर्गत गुन्ह्याप्रकरणी ठाणे न्यायालयाने महत्त्वाचा निर्णय दिला आहे. न्यायालयाने विनायक राऊत आणि त्यांचा मुलगा गितेश राऊत यांनी दाखल केलेला अंतरिम अटकपूर्व दिलासाचा अर्ज फेटाळून लावला आहे. त्यामुळे मुख्य अटकपूर्व जामीन अर्जावर निर्णय होईपर्यंत त्यांना अटकेपासून कोणतेही संरक्षण मिळणार नाही.
अंतरिम दिलासा नाकारल्याने अटकेची शक्यता
या प्रकरणातील मुख्य अटकपूर्व जामीन अर्जावर अद्याप अंतिम सुनावणी झालेली नसली तरी, तोपर्यंत पोलिसांनी अटक करू नये, अशी मागणी करणारा अंतरिम अर्ज न्यायालयाने फेटाळला. त्यामुळे कापूरबावडी पोलिसांना चौकशीसाठी आवश्यक वाटल्यास विनायक राऊत आणि गितेश राऊत यांना ताब्यात घेण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
वकिलांची प्रतिक्रिया
फिर्यादी गिरीजा राऊत यांचे कायदेशीर सल्लागार ॲड. सागर कदम यांनी न्यायालयाच्या आदेशानंतर प्रतिक्रिया देताना सांगितले की, या प्रकरणात दोन अजामीनपात्र कलमे लागू असल्यामुळे पुरेसे पुरावे आढळल्यास पोलिसांना अटकेची कारवाई करण्याचा अधिकार आहे.
गिरीजा राऊत यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी
न्यायालयाचा आदेश आल्यानंतर गिरीजा राऊत यांनी समाधान व्यक्त केले. त्यांनी पोलिसांनी या प्रकरणात लवकर कारवाई करावी, अशी मागणी केली. तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही या प्रकरणात लक्ष घालून मला लवकर न्याय मिळवून द्यावा, अशी विनंती त्यांनी केली. गुन्हा दाखल झाल्यापासून राऊत कुटुंबीयांनी आपल्याशी कोणताही संपर्क साधलेला नसल्याचाही दावा त्यांनी केला.
नेमकं प्रकरण काय?
गिरीजा राऊत यांनी ठाण्यातील कापूरबावडी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करत सासरच्या मंडळींकडून कौटुंबिक छळ होत असल्याचा आरोप केला आहे. याशिवाय, काही भोंदू बाबांच्या माध्यमातून जादूटोणा केल्याचाही गंभीर आरोप त्यांनी केला आहे.
या तक्रारीच्या आधारे पोलिसांनी कौटुंबिक छळ आणि महाराष्ट्र नरबळी व इतर अमानुष, अनिष्ट व अघोरी प्रथा व जादूटोणा प्रतिबंधक कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणात आतापर्यंत दोन भोंदू बाबांना अटक करण्यात आली असून ते सध्या पोलीस कोठडीत आहेत.
दरम्यान, विनायक राऊत आणि गितेश राऊत यांच्या मुख्य अटकपूर्व जामीन अर्जावर 23 जुलै रोजी सुनावणी होणार असून, या प्रकरणाकडे राजकीय आणि कायदेशीर वर्तुळाचे लक्ष लागले आहे.
News Title: Vinayak Raut Interium Bail Rejected Thane Court

