Vasai-Virar Mayor | राज्यातील महानगरपालिका निवडणुकांचे निकाल जाहीर झाल्यानंतर आता वसई-विरार शहर महानगरपालिकेच्या महापौर निवडीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. येत्या ३० किंवा ३१ जानेवारी २०२६ रोजी महापालिकेत महापौर निवडीची प्रक्रिया पार पडणार आहे. विधानसभा निवडणुकीतील संमिश्र निकालानंतर, बहुजन विकास आघाडीचे (बविआ) अध्यक्ष हितेंद्र ठाकूर यावेळी अधिक सावध पावलं टाकत महापालिकेत सत्ता मजबूत करण्यावर भर देत असल्याचं दिसून येत आहे.
महापौर पदासाठी चर्चेतील सहा चेहरे :
वसई-विरार महापालिकेत महापौरपदासाठी सध्या सहा नावांची जोरदार चर्चा सुरू आहे. मात्र पक्षाचे रणनीतीकार आणि संकटमोचक म्हणून ओळखले जाणारे आजीव पाटील यांचे नाव आघाडीवर असल्याचे बोलले जात आहे. सामाजिक समतोल राखत सर्व समाजघटकांना प्रतिनिधित्व देण्याची हितेंद्र ठाकूर (Hitendra Thakur) यांची परंपरा पाहता, यावेळी कोणाला संधी मिळणार याबाबत राजकीय वर्तुळात मोठी उत्सुकता आहे. (Vasai-Virar Mayor Election)
महापौरपदाच्या शर्यतीत आजीव पाटील (Aajiv Patil), माजी महापौर प्रवीण शेट्टी, माजी उपमहापौर प्रकाश रॉड्रीग्ज, आगरी समाजाचे प्रतिनिधी कन्हैया बेटा भोईर, मुस्लिम समाजातील अनुभवी नेते आलमगीर डायर आणि तरुण चेहरा आफिफ जमील शेख यांची नावे चर्चेत आहेत. प्रत्येक उमेदवाराचा वेगळा सामाजिक आणि राजकीय आधार असल्यामुळे निवड अधिक रोचक ठरण्याची शक्यता आहे.
Vasai-Virar Mayor | आजीव पाटील यांचे नाव का आघाडीवर? :
नुकत्याच पार पडलेल्या महापालिका निवडणुकांमध्ये बविआने आपली ताकद टिकवून ठेवली आहे. भाजपाकडून वाढत असलेल्या राजकीय दबावाला रोखण्यासाठी पक्षाला अनुभवी, आक्रमक आणि संघटन बांधणी करणारा चेहरा हवा असल्याचे बोलले जात आहे. आजीव पाटील हे पक्षाचे संघटक सचिव असल्याने नगरसेवकांची मोट बांधण्यात त्यांची भूमिका महत्त्वाची ठरू शकते, अशी चर्चा आहे.
दरम्यान, २२ जानेवारी २०२६ रोजी महापौर पदासाठी सोडत काढण्यात आली असून, त्यानुसार हे पद सर्वसाधारण प्रवर्गासाठी आरक्षित करण्यात आले आहे. त्यामुळे बविआमधील कोणत्याही गटातील अनुभवी नगरसेवकाला महापौर होण्याची संधी खुली झाली आहे. जर आजीव पाटील यांची निवड झाली, तर उपमहापौर पदासाठी प्रकाश रॉड्रीग्ज किंवा आलमगीर डायर यांचं नाव पुढे येण्याची शक्यता वर्तवली जात आहे, ज्यामुळे सामाजिक समतोल राखला जाईल.






