Bharat Gogawale | महाड नगरपरिषद निवडणुकीदरम्यान झालेल्या मारहाण आणि दंगलीच्या प्रकरणात आरोपी असलेले मंत्री भरत गोगावले यांचे पुत्र विकास गोगावले अखेर महाड पोलिसांसमोर (Mahad police) आत्मसमर्पण झाले आहे. गेल्या काही दिवसांपासून फरार असलेले विकास गोगावले आज सकाळी कोणालाही खबर न देता पोलीस ठाण्याच्या मागील प्रवेशद्वाराने आत गेले आणि पोलिसांना शरण आले. आता त्यांना न्यायालयात हजर करण्यात येणार आहे.
विकास गोगावले (vikas gogawale) यांच्या अटकपूर्व जामीन अर्जावर आज सुनावणी होणार असून न्यायालय त्यांना दिलासा देणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. 2 डिसेंबर 2025 पासून ते फरार होते. या प्रकरणात पुतण्या महेश गोगावले, माजी आमदार माणिक जगताप यांचे पुत्र आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते श्रीयांश जगताप यांच्यावरही गुन्हे दाखल आहेत.
विकास गोगावले पोलिसांसमोर शरण :
विकास गोगावले फरार राहिल्यानंतर मुंबई उच्च न्यायालयाने राज्य सरकार आणि पोलिस प्रशासनावर कठोर शब्दांत ताशेरे ओढले होते. “मंत्र्यांची मुलं सापडत कशी नाहीत?” अशा शब्दांत न्यायालयाने नाराजी व्यक्त करत विकास गोगावले यांना सकाळी 11 वाजेपर्यंत पोलिसांसमोर हजर होण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार त्यांनी आज महाड पोलिसांना शरणागती पत्करली.
सध्या महाड पोलीस ठाण्याबाहेर मोठा बंदोबस्त तैनात असून विकास गोगावले यांची चौकशी सुरू आहे. त्यांना लवकरच कोर्टात हजर करण्यात येणार आहे.
Bharat Gogawale | नेमकं प्रकरण काय? :
महाड नगरपरिषद निवडणुकीदरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसचे सुशांत जाबरे आणि विकास गोगावले समर्थकांमध्ये जोरदार वाद झाला होता. त्यानंतर वाहनांची तोडफोड आणि एकमेकांवर हल्ल्याचे प्रकार घडले. या प्रकरणी दोन्ही बाजूंनी परस्परविरोधी तक्रारी दाखल करण्यात आल्या होत्या. त्यानंतर अनेक आरोपी पोलिसांना शरण आले नव्हते आणि न्यायालयाने त्यांच्या जामीन अर्जांनाही नकार दिला होता.
आता विकास गोगावले यांच्या आत्मसमर्पणामुळे या प्रकरणाला नवे वळण मिळाले असून अटकपूर्व जामीन सुनावणीचा निकाल काय लागतो, याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.






