Vasant More | पुणे महानगरपालिका निवडणुकीच्या धक्कादायक निकालानंतर आता राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. पराभवानंतर माजी नगरसेवक वसंत मोरे (Vasant More) यांनी थेट सत्ताधाऱ्यांवर गंभीर आरोप करत “षडयंत्र रचून प्रमुख नगरसेवकांना पाडण्यात आलं,” असा दावा केला आहे. त्यांच्या या सोशल मीडिया पोस्टमुळे पुण्याच्या राजकारणात नव्या चर्चेला सुरुवात झाली आहे.
वसंत मोरे हे पुण्याच्या प्रभाग क्रमांक 38 मधून निवडणूक लढवत होते, मात्र भाजपच्या संदीप बेलदरे यांनी त्यांचा सुमारे हजार मतांनी पराभव केला. विशेष म्हणजे वसंत मोरेंसह त्यांचा मुलगाही शिवसेना ठाकरे गटाकडून निवडणुकीच्या मैदानात होता आणि दोघांचाही मोठ्या फरकाने पराभव झाला. फायरब्रँड नेता म्हणून ओळख असलेल्या मोरेंचा असा पराभव झाल्याने शहरात मोठी चर्चा रंगली होती.
‘षडयंत्र रचून प्रमुख नेत्यांना पाडण्यात आलं’; मोरे :
निवडणूक निकालानंतर आठवड्याभराने वसंत मोरे (Vasant More) यांनी सोशल मीडियावर लांबलचक पोस्ट लिहीत सत्ताधाऱ्यांवर आरोप केले आहेत. “राज्य सरकारने 2022 ते 2026 या कालावधीत पुणे महानगरपालिकेत प्रशासनाला हाताशी धरून केलेला कारभार वेळोवेळी बाहेर येईल, या भीतीने प्रमुख पदांवर काम करणाऱ्या सर्व पक्षीय नगरसेवकांना पाडण्यात आलं,” असा दावा त्यांनी केला आहे. हे सर्व जाणीवपूर्वक रचलेलं षडयंत्र असल्याचा आरोपही त्यांनी केला.
मोरे यांनी आपल्या पोस्टमध्ये अनेक माजी विरोधी पक्षनेते, महापौर, सभागृह नेते आणि स्थायी समिती सदस्यांची नावे घेतली आहेत. “हे सर्वजण जर सभागृहात असते, तर राज्य सरकारच्या चार वर्षांच्या पापाचा पाढा सातत्याने बाहेर काढला असता,” असंही त्यांनी नमूद केलं आहे. त्यांच्या या वक्तव्यामुळे सत्ताधाऱ्यांवर टीकेची झोड उठली असून राजकीय वातावरण तापलं आहे.
Vasant More | पुण्याच्या राजकारणात खळबळ :
पुणे मनपा निवडणुकीत (PMC election results) भाजपने मोठे यश मिळवले असले तरी अनेक दिग्गज नगरसेवकांचा पराभव हा चर्चेचा विषय ठरला आहे. त्यातच वसंत मोरे यांच्या आरोपांमुळे या निकालांवर प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे. सोशल मीडियावरही या पोस्टची मोठ्या प्रमाणात चर्चा सुरू असून समर्थक आणि विरोधकांमध्ये जोरदार प्रतिक्रिया उमटत आहेत. (Pune Municipal Corporation)
आता या आरोपांवर सत्ताधाऱ्यांकडून काय प्रतिक्रिया येते, तसेच याप्रकरणी पुढील राजकीय घडामोडी काय घडतात, याकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलं आहे.






