Mumbai Mayor | मुंबई महानगरपालिका निवडणुकीनंतर आता संपूर्ण शहराचे लक्ष महापौरपदाच्या निवडीकडे लागले आहे. यंदा महापौरपद महिलांसाठी राखीव झाल्यामुळे भाजपमधील दिग्गज महिला नगरसेविकांची नावे चर्चेत आली आहेत. महायुती कोणाला संधी देणार, यावर राजकीय वर्तुळात मोठी उत्सुकता निर्माण झाली आहे.
भाजपकडून मराठी महिला चेहरा देण्यावर विशेष भर दिला जात असल्याचे सूत्रांकडून सांगण्यात येत आहे. अनुभवी नगरसेविका तसेच तरुण आणि प्रभावी चेहऱ्यांमध्ये चुरस निर्माण झाली असून पक्षाकडे सध्या ४७ महिला नगरसेविका आहेत. त्यामुळे महापौरपदासाठी स्पर्धा अधिकच रंगली आहे. (BMC election)
भाजपच्या महापौरपदाच्या प्रमुख दावेदार महिला नगरसेविका :
महापौरपदासाठी भाजपच्या गोटातून अलका केरकर, तेजस्वी घोसाळकर आणि राजश्री शिरवाडकर यांची नावे आघाडीवर असल्याची चर्चा आहे. याशिवाय राणी द्विवेदी, श्वेता कोरगावकर, योगिता पाटील, सीमा किरण शिंदे, डॉ. शिल्पा सांगोरे, दक्षिता कवठणकर, लीना देहरकर आणि निशा बंतेरा यांचाही दावेदार म्हणून उल्लेख केला जात आहे. या सर्व महिला नगरसेविकांनी आपल्या कामगिरीतून पक्षात वेगळी ओळख निर्माण केली आहे. (Mumbai Mayor)
पक्ष नेतृत्वाकडून अनुभवी आणि प्रभावी महिला चेहऱ्याला संधी देण्याचा विचार सुरू असून मुंबईसारख्या महानगराचे नेतृत्व कोणाच्या हाती जाणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. भाजपची हायकमांड आणि महायुतीतील घटक पक्षांच्या चर्चेनंतर अंतिम निर्णय जाहीर केला जाणार आहे.
Mumbai Mayor | मुंबईच्या महापौरपदी कोणाची वर्णी लागणार? :
दरम्यान, मुंबई महापालिका (Mumbai Mahapalika) निवडणुकीत भाजपने सर्वाधिक ८९ जागा जिंकून मोठे यश मिळवले आहे. शिवसेना ठाकरे गट ६५ जागांसह दुसऱ्या क्रमांकावर असून भाजप-शिवसेना शिंदे गट युतीकडून सत्ता स्थापनेची प्रक्रिया सुरू आहे. त्यामुळे महापौरपदासाठी भाजपचाच उमेदवार निश्चित मानला जात असून अंतिम निर्णयाकडे मुंबईकरांचे लक्ष लागले आहे.
राजकीय वर्तुळात अनेक नावांची चर्चा सुरू असली तरी भाजपच्या सरप्राईज निर्णयामुळे नेमकी कोणत्या महिला नगरसेविकेच्या गळ्यात महापौरपदाची माळ पडणार, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.






