Vaishnavi Hagawane | उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पुण्यातील निकटवर्तीय आणि मुळशी तालुका अध्यक्ष राजेंद्र हगवणे यांच्या अडचणीत मोठी वाढ झाली आहे. त्यांची धाकटी सून वैष्णवी हगवणे हिने राहत्या घरात गळफास घेतल्याने एकच खळबळ उडाली आहे. या घटनेनंतर राजेंद्र हगवणे हे सध्या फरार असून, त्यांच्यावर सुनेला हुंड्यासाठी मानसिक आणि शारीरिक छळ करून आत्महत्येला प्रवृत्त केल्याचा गंभीर आरोप आहे.
मृतदेहावर मारहाणीचे व्रण-
वैष्णवीचे (Vaishnavi Hagawane) वडील आनंद कस्पटे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, वैष्णवीचा पती शशांक, सासू, सासरे राजेंद्र हगवणे, नणंद आणि दीर यांनी हुंड्यासाठी तिचा अतोनात छळ केला आणि तिला क्रूर वागणूक दिली, ज्यामुळे ती तिच्या मृत्यूला कारणीभूत ठरली. वैष्णवीच्या मृतदेहावर मारहाणीचे व्रण आढळून आल्याने कुटुंबीयांनी ही आत्महत्या नसून हत्या असल्याचा संशय व्यक्त केला आहे.
या प्रकरणात सध्या हुंडाबळी आणि मृत्यूस कारणीभूत असल्याच्या कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बावधन पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, व्हिसेरा (Viscera) राखून ठेवण्यात आला असून, तपासात काही निष्पन्न झाल्यास त्यानुसार कलमवाढ करण्यात येईल. दरम्यान, वैष्णवीला अमानुषपणे मारहाण केल्यानंतरचे फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
वैष्णवीच्या अंगावर असणाऱ्या जखमा तिच्या पाठीवरच्या आणि छातीवरच्या जखमा चे फोटो टाकण्याचा धाडस मी इथं करत नाही कारण तिची कुठे ना कुठेतरी Dignity राहावी
बेकार मारहाण त्या पोरीला झालेली आहे
तिच्या शरीराच्या संपूर्ण भागावर अशा जखमा आहेत pic.twitter.com/IzSp2jrLlI
— गजाभाऊ (@gajabhauX) May 21, 2025
सासरच्यांकडून २ कोटी रुपयांच्या मागणी-
या प्रकरणात, राजेंद्र हगवणे, त्यांची पत्नी आणि मुलावर आत्महत्येला प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल झाला आहे. विशेष म्हणजे, राजेंद्र हगवणे हे गुन्हा दाखल झाल्यापासून फरार झाले आहेत. त्यांच्यावर धाकट्या (Vaishnavi Hagawane) सुनेचा हुंड्यासाठी अमानुष छळ केल्याचा आरोप आहे. वैष्णवीचा प्रेमविवाह झाला होता, त्यावेळी तिच्या माहेरच्यांनी तिला ५१ तोळे सोनं, फॉर्च्युनर गाडी आणि चांदीची भांडी दिली होती. तरीही, सासरच्यांकडून जमीन खरेदीसाठी २ कोटी रुपयांच्या मागणीचा तगादा लावला जात होता. पती शशांक हा तिच्या चारित्र्यावरही संशय घेत होता, असे आरोपांमध्ये म्हटले आहे.
केवळ धाकटी सून वैष्णवीच नव्हे, तर राजेंद्र हगवणे यांच्या मोठ्या सुनेचाही असंच काहीसा छळ हगवणे कुटुंबीयांनी केला होता. नोव्हेंबर २०२४ मध्ये मोठ्या सुनेने पौड पोलीस स्टेशनमध्ये छळवणुकीची आणि बेदम मारहाणीची तक्रार दिली होती आणि त्या प्रकरणी गुन्हाही दाखल झाला होता. त्यावेळी राजेंद्र हगवणे यांनी कपडे फाटेपर्यंत मारहाण केली आणि मनास लज्जा निर्माण होईल असे कृत्य केले, असे मोठ्या सुनेने तक्रारीत नमूद केले होते.






