Vaishnavi Hagawane | पुण्यात भुकूम (Bhukum) येथे राष्ट्रवादी काँग्रेसच्या (Ajit Pawar Group) नेते राजेंद्र हगवणे (Rajendra Hagawane) यांच्या सुनेने आत्महत्या केल्यानंतर समोर येत असलेली माहिती अधिकच धक्कादायक ठरत आहे. वैष्णवी शशांक हगवणे (Vaishnavi Shashank Hagawane) हिला दीर्घकाळ मानसिक, शारीरिक आणि आर्थिक छळाला सामोरं जावं लागलं होतं. तिच्या वडिलांनी दिलेल्या तक्रारीतून अनेक गंभीर बाबी समोर आल्या आहेत.
गर्भवती असतानाही चारित्र्यावर संशय, आत्महत्येचा प्रयत्न
ऑगस्ट २०२३ मध्ये वैष्णवी (Vaishnavi Hagawane) गर्भवती राहिल्यानंतर तिच्या पती शशांक हगवणे याने या बाळावर संशय घेत “हे मूल माझं नाही” असा आरोप करत तिच्यावर हात उगारला आणि घराबाहेर हाकलून दिलं. त्यानंतर सासरच्या लोकांच्या सततच्या त्रासाला कंटाळून तिने विष पिऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. ती औंध येथील खाजगी रुग्णालयात दाखल होती. त्या काळात तिच्या सासरच्या कुणीही तिला भेट दिली नाही, असा आरोप तक्रारीत नमूद आहे.
सासू-नंदेकडून अमानुष वागणूक-
मार्च २०२५ मध्ये किरकोळ कारणावरून सासू लता हगवणे आणि नणंद करिश्मा हगवणे यांनी वैष्णवीला (Vaishnavi Hagawane) शिवीगाळ केली, मारहाण केली आणि तिच्या तोंडावर थुंकले. एवढंच नव्हे तर तिला गाडीत बसवून वाकड येथे नेले आणि वाटेतही मारहाण केली. वैष्णवीने “मी गाडीतून उडी मारेन” असं म्हटल्यानंतर मारहाण थांबवण्यात आली. ही संपूर्ण घटना वैष्णवीने तिच्या आईला सांगितली होती, असं तक्रारीत नमूद आहे.
दोन कोटी रुपयांची मागणी-
तक्रारीनुसार, पती शशांक हगवणे याने नंतर तिच्या वडिलांकडे जमीन खरेदीसाठी दोन कोटी रुपयांची मागणी केली. पैसे न दिल्यास प्रतिष्ठेला धक्का बसेल अशी धमकी देत वैष्णवीला पुन्हा मारहाण करण्यात आली. “आम्ही भुकूममधील प्रतिष्ठित राजकीय व्यक्ती आहोत, तुम्ही आमच्याशी बरोबरी करू शकत नाही,” असे सांगून तिला अपमानास्पद वागणूक देण्यात आली.






