Vaishnavi Hagawane | पुण्यातील वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरण दिवसेंदिवस अधिक गुंतागुंतीचे आणि तितकेच संवेदनशील होत चालले आहे. या प्रकरणाचा तपास आता एका अत्यंत महत्त्वाच्या टप्प्यावर पोहोचला असून, पोलिसांच्या प्रत्येक कारवाईकडे आणि न्यायालयाच्या प्रत्येक निर्णयाकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे. दरम्यान, काही महत्त्वपूर्ण वस्तू फॉरेन्सिक तपासणीसाठी पाठवण्यात येणार आहेत, ज्यामुळे या प्रकरणातील सत्य बाहेर येण्यास मोठी मदत होणार आहे.
फॉरेन्सिक तपासणी – सत्य उलगडणार?
वैष्णवीने ज्या पंख्याला गळफास लावून घेतला आणि ज्या साडीचा त्यासाठी वापर केला, ती साडी आणि तो पंखा बावधन पोलीस आज, म्हणजेच मंगळवारी, न्यायवैद्यक प्रयोगशाळेकडे (फॉरेन्सिक लॅब) पाठवणार आहेत. हा तपास अनेक दृष्टीने महत्त्वाचा ठरणार आहे. पंचनाम्यात वैष्णवीचे वजन ७१ किलो असल्याचे नोंदवण्यात आले आहे. त्यामुळे, घरातील तो सामान्य दिसणारा पंखा खरंच ७१ किलो वजन पेलू शकतो का, याची वैज्ञानिक पद्धतीने तपासणी केली जाईल.
आत्महत्या की हत्या?
वैष्णवीला सासरी होणारा त्रास, तिला झालेली मारहाण आणि तिच्याकडून करण्यात आलेल्या मागण्या, या सगळ्यामुळे वैष्णवीने आपले जीवन संपवले, असा आरोप आहे. मात्र, ही आत्महत्या नसून, तिची हत्या करून तिला पंख्याला लटकावण्यात आले असावे, असा गंभीर संशय वैष्णवीच्या माहेरच्यांनी सुरुवातीपासूनच व्यक्त केला आहे. त्यामुळे, पोलीस आता सर्वच बाजूंनी या प्रकरणाचा तपास करत आहेत. फॉरेन्सिक अहवाल, साक्षीदारांचे जबाब, आरोपींची चौकशी आणि परिस्थितीजन्य पुरावे, या सगळ्यांच्या आधारावर पोलीस अंतिम निष्कर्षापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करतील.






