Pune-Beed Train | पुणे आणि बीडला थेट रेल्वेने जोडणारी बहुप्रतीक्षित सेवा अखेर सुरू होत आहे. अनेक वर्षांपासून या मार्गावरील रेल्वेची प्रतीक्षा करणाऱ्या प्रवाशांना यामुळे मोठा पर्याय मिळणार आहे. पुणे ते बीड प्रवासासाठी सुमारे सात तास लागणार असून गाडीमध्ये 16 डबे असतील. रेल्वे बोर्डाने या सेवेचे वेळापत्रक आणि मार्गातील प्रमुख थांबे जाहीर केले आहेत.
पुणे-बीड थेट रेल्वेला हिरवा झेंडा :
गुरुवारी 17 सप्टेंबर रोजी बीड रेल्वे स्थानकावर या नव्या सेवेचा उद्घाटन सोहळा आयोजित करण्यात आला आहे. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार (Sunetra Pawar) यांच्या हस्ते ट्रेनला हिरवा झेंडा दाखवून सेवेचा प्रारंभ केला जाणार आहे. यावेळी पुणे रेल्वे विभागातील वरिष्ठ अधिकारीही उपस्थित राहणार आहेत. रेल्वे बोर्डाने बुधवारी या गाडीचे अधिकृत वेळापत्रक जाहीर केले आहे. त्यानुसार पुणे आणि बीडमधील अंतर रेल्वेने सुमारे सात तासांत पूर्ण करता येणार आहे.
नवीन रेल्वेमुळे बीडसह परिसरातील नागरिकांना पुण्याशी थेट रेल्वे संपर्क मिळणार आहे. दररोज ही सेवा उपलब्ध होणार असल्याने नोकरीसाठी पुण्यात ये-जा करणारे कर्मचारी, शिक्षणासाठी प्रवास करणारे विद्यार्थी आणि व्यवसायानिमित्त पुणे किंवा मराठवाड्यात जाणाऱ्या व्यापाऱ्यांची मोठी सोय होणार आहे. या गाडीला एकूण 16 डबे असून एका फेरीत जवळपास 2 हजार प्रवाशांना प्रवास करता येण्याची क्षमता असल्याचे सांगण्यात आले आहे. पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाडा यांच्यातील रेल्वे संपर्क अधिक सुलभ करण्याच्या दृष्टीनेही हा मार्ग महत्त्वाचा ठरणार आहे.
Pune-Beed Train | वेळापत्रक आणि रेल्वेचे थांबे :
रेल्वे बोर्डाने जाहीर केलेल्या नियोजनानुसार पुण्याहून बीडकडे जाणारी गाडी क्रमांक 11433 रात्री 10 वाजून 45 मिनिटांनी पुणे स्थानकातून रवाना होईल. ही गाडी दुसऱ्या दिवशी सकाळी 6 वाजता बीड येथे पोहोचणार आहे. त्यामुळे रात्रीचा प्रवास करून सकाळी बीडला पोहोचण्याची सुविधा प्रवाशांना मिळणार आहे. परतीच्या दिशेने गाडी क्रमांक 11434 बीडहून रात्री 9 वाजून 30 मिनिटांनी सुटेल आणि दुसऱ्या दिवशी पहाटे 5 वाजून 20 मिनिटांनी पुण्यात दाखल होईल.
पुणे-बीड मार्गावर प्रवाशांसाठी उरुळी, दौंड कॉर्ड लाईन, श्रीगोंदा रोड, अहिल्यानगर (Ahilyanagar), नारायणडोहो, नवीन आष्टी आणि अमळनेर या स्थानकांवर गाडीला थांबा देण्यात आला आहे. त्यामुळे या स्थानकांच्या परिसरातील नागरिकांनाही थेट रेल्वेसेवेचा लाभ घेता येणार आहे. दरम्यान, 17 सप्टेंबर रोजी उद्घाटन होत असले तरी गाडीच्या नियमित व्यावसायिक सेवेची तारीख रेल्वे बोर्डाने अद्याप अधिकृतपणे जाहीर केलेली नाही. उद्घाटनानंतर लवकरच ही सेवा सर्वसामान्य प्रवाशांसाठी नियमितपणे उपलब्ध होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.








