Vaishnavi Hagawane | पुण्यातील वैष्णवी हगवणेच्या मृत्यू प्रकरणाने सध्या संपूर्ण राज्यात एकच खळबळ उडवून दिली आहे. वैष्णवीने आत्महत्या केल्याचे म्हटले जात असले तरी, तिच्या कुटुंबीयांनी मात्र हा आत्महत्येचा प्रकार नसून, तिचा खून करण्यात आल्याचा गंभीर दावा केला आहे.
या प्रकरणामुळे अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत, विशेषतः लग्नात ५१ तोळे सोने, फॉर्च्यूनर गाडी आणि इतर अनेक मौल्यवान वस्तू भेट देऊनही वैष्णवीने टोकाचे पाऊल का उचलले, यावर अनेक तर्कवितर्क लावले जात आहेत. आता या प्रकरणात वैष्णवीचा शवविच्छेदन अहवाल समोर आला असून, त्यातील माहितीने प्रकरणाची गंभीरता आणखी वाढली आहे.
वैष्णवीच्या शवविच्छेदन अहवाल समोर-
वैष्णवीच्या (Vaishnavi Hagawane) शवविच्छेदन अहवालामध्ये धक्कादायक माहिती समोर आली आहे. अहवालानुसार, वैष्णवीचा मृत्यू गळफास घेतल्याने झाला असल्याचे नमूद करण्यात आले आहे. मात्र, यासोबतच एक महत्त्वाचा मुद्दा समोर आला आहे की, वैष्णवीच्या संपूर्ण शरीरावर जखमा झाल्या आहेत. या जखमांमुळेही तिचा मृत्यू झालेला असू शकतो अशी शक्यता या शवविच्छेदन अहवालामध्ये व्यक्त करण्यात आली आहे. त्यामुळे, वैष्णवीने आत्महत्या केली की तिच्यासोबत काही घातपात घडला, असे अनेक प्रश्न या अहवालामुळे निर्माण झाले आहेत, ज्यामुळे पोलिसांना तपासाची दिशा बदलावी लागण्याची शक्यता आहे.
ऑडिओ क्लिपही व्हायरल-
सध्या वैष्णवी (Vaishnavi Hagawane) हिच्या शवविच्छेदनाचे सॅम्पल विसेरा राखून ठेवण्यात आले आहेत, असेही अहवालात नमूद करण्यात आले आहे. याचा अर्थ, पुढील तपास आणि रासायनिक विश्लेषणानंतरच मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट होऊ शकेल. त्यामुळे या प्रकरणात आता नेमके काय समोर येणार, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे, कारण विसेरा अहवालामुळे अनेक गुंतागुंत उलगडण्यास मदत होऊ शकते.
दरम्यान, या प्रकरणात वैष्णवी हगवणेची एक कथित ऑडिओ क्लिपही व्हायरल झाली आहे. या ऑडिओ क्लिपमध्ये वैष्णवी तिच्या सासरच्या मंडळींबद्दल बोलताना दिसत आहे, ज्यामुळे तिला होत असलेल्या त्रासाची कल्पना येते.
माझा नवरा माझा कधीच होऊ शकला नाही-
या क्लिपमध्ये ती तिच्या पती शशांकचाही उल्लेख करते. ती म्हणते, “माझा नवरा माझा कधीच होऊ शकला नाही. सासू-सासरे तर असेच असतात. पण माझा नवरा माझा होऊ शकला नाही याचं मला फार दुःख आहे.” यातून तिच्या प्रेमविवाहातील अपयश आणि वैवाहिक आयुष्यातील वेदना स्पष्टपणे समोर येतात.
या ऑडिओ क्लिपमध्ये वैष्णवीने हेही बोलून दाखवले आहे की, “मी आता या सर्व प्रकरणाला कंटाळले आहे. त्यामुळे मी शशांकशी घटस्फोट घेणार आहे. मी याबाबत माझ्या पप्पांशी बोलले आहे. पप्पांनीही आपण यावर विचार करू असं सांगितलं आहे.” यावरून वैष्णवी घटस्फोट घेण्याच्या तयारीत होती आणि तिने आपल्या वडिलांशी याबाबत चर्चा केली होती, हे स्पष्ट होते.






