Vaishnavi Hagawane | पुण्यातील भुकूम (Bhukum) येथे वैष्णवी हगवणे (Vaishnavi Hagawane) हिने हुंड्याच्या छळाला कंटाळून गळफास घेऊन आत्महत्या केल्याच्या प्रकरणात आता खळबळजनक घडामोडी समोर येत आहेत. या प्रकरणात तिचा पती शशांक, सासू लता आणि नणंद करिष्मा यांना पोलिसांनी अटक करून कोठडीत रवानगी केली आहे, तर सासरे राजेंद्र हगवणे (Rajendra Hagawane) आणि दीर सुशील हगवणे हे अद्याप पोलिसांना चकवा देत फरार आहेत.
एनसीपी नेते असूनही सासरे फरार-
राजेंद्र हगवणे हे राष्ट्रवादी काँग्रेस (Ajit Pawar Group) च्या राज्य कार्यकारिणीचे सदस्य असूनही पोलिस कारवाईपासून अद्याप फरार आहेत. पीडितेचे वडील आनंद कस्पटे (Anand Kasapte) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, वैष्णवीवर (Vaishnavi Hagawane) हुंड्यासाठी मानसिक आणि शारीरिक छळ करण्यात आला. तिच्या मृत्यूला जबाबदार असलेल्या सासरच्यांनी वारंवार तिची मानहानी केली आणि तिच्यावर मारहाण केली. शवविच्छेदनात तिच्या अंगावर जखमेचे व्रण आढळून आले आहेत.
व्हिसेरा राखीव; तपासानुसार कलमे वाढणार
सध्या बावधन पोलिसांनी (Bavdhan Police Station) या प्रकरणात हुंडाबळी आणि मृत्यूस प्रवृत्त केल्याच्या कलमांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. शवविच्छेदनानंतर व्हिसेरा तपासणीसाठी राखून ठेवण्यात आला आहे. तपासात काही नवीन बाबी पुढे आल्यास गुन्ह्याच्या कलमांमध्ये वाढ केली जाईल, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.
वैष्णवीने घेतला टोकाचा निर्णय
१६ मे रोजी वैष्णवीने आपल्या बेडरूमचा दरवाजा बंद करून गळफास घेतला. पती शशांकने दरवाजा तोडून तिला रुग्णालयात दाखल केले, मात्र डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले. तिचा मृतदेह ससून रुग्णालयात (Sassoon Hospital) शवविच्छेदनासाठी नेण्यात आला.
या घटनेमुळे भुकूम परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. राजकीय नेत्याच्या घरात घडलेल्या या प्रकारामुळे राजकीय पातळीवरही संताप व्यक्त केला जात आहे. पोलिसांनी या प्रकरणात अटक आणि तपास अधिक तीव्र केला असून, फरार आरोपींना लवकरच अटक केली जाईल, असे सांगण्यात येत आहे.






