UPI Wallet | युपीआयच्या वाढत्या वापरामुळे डिजिटल व्यवहार आता दैनंदिन जीवनाचा भाग बनले आहेत. दरम्यान, सोशल मीडियावर एका नव्या दाव्याची जोरदार चर्चा सुरू आहे. अनेक दिवस युपीआय ॲपमधील वॉलेट सुविधा वापरली नाही तर दंड आकारला जाईल आणि बँक खात्यातून पैसे कापले जातील, असे संदेश व्हायरल होत आहेत. त्यामुळे अनेक वापरकर्त्यांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे.
वॉलेट शुल्काबाबत काय आहे चर्चा? :
अलीकडे फोनपे (PhonePe) वॉलेटशी संबंधित निष्क्रियता शुल्काबाबत विविध पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल झाल्या आहेत. या पोस्टमध्ये असे सांगितले जात आहे की, जर एखाद्या ग्राहकाने बराच काळ वॉलेटचा वापर केला नाही, तर त्या वॉलेटवर काही शुल्क लागू होऊ शकते. मात्र हे शुल्क थेट युपीआय व्यवहारांवर किंवा बँक खात्यावर लागू होत नाही, तर केवळ वॉलेट सेवेशी संबंधित असते.
महत्त्वाची बाब म्हणजे युपीआय खाते आणि डिजिटल वॉलेट या दोन स्वतंत्र सुविधा आहेत. युपीआयद्वारे होणारे व्यवहार थेट बँक खात्यातून केले जातात. तर वॉलेटमध्ये आधीच पैसे जमा करून ते वापरले जातात. त्यामुळे केवळ युपीआय पेमेंटसाठी ॲपचा वापर करणाऱ्या आणि वॉलेटमध्ये पैसे न ठेवणाऱ्या ग्राहकांना कोणतीही अतिरिक्त चिंता करण्याची आवश्यकता नाही.
UPI Wallet | बँक खात्यातून पैसे कापले जातील का? :
जर एखाद्या वापरकर्त्याच्या वॉलेटमध्ये कोणतीही शिल्लक रक्कम नसेल आणि वॉलेट फक्त सक्रिय स्थितीत असेल, तर त्याच्या लिंक असलेल्या बँक खात्यातून थेट पैसे वजा होणार नाहीत. अशा परिस्थितीत बँक खाते सुरक्षित राहते. निष्क्रियता शुल्क लागू झाले तरी ते फक्त वॉलेटमध्ये उपलब्ध असलेल्या रकमेपुरते मर्यादित असते. त्यामुळे वॉलेट रिकामे असल्यास शुल्क वसूल करण्यासाठी बँक खात्यातून रक्कम कपात केली जात नाही.
तज्ज्ञांच्या मते, ग्राहकांनी वेळोवेळी आपल्या वॉलेटमधील शिल्लक तपासावी. वॉलेटची आवश्यकता नसल्यास त्यामध्ये पैसे ठेवू नयेत. तसेच संबंधित कंपनीकडून जारी करण्यात येणाऱ्या अधिकृत सूचना आणि नियमांकडे लक्ष द्यावे. विविध डिजिटल वॉलेट कंपन्यांचे नियम वेगवेगळे असू शकतात. काही कंपन्या दीर्घकाळ निष्क्रिय असलेल्या वॉलेटवरील शिल्लक रकमेवर शुल्क आकारू शकतात. मात्र वॉलेटचा वापर बंद असल्यामुळे थेट बँक खात्यातून पैसे कापले जातील, हा दावा दिशाभूल करणारा असल्याचे स्पष्ट करण्यात येत आहे.






