Ketan Agrawal Case | पुण्यातील तरुण उद्योजक केतन अग्रवाल यांच्या मृत्यूप्रकरणाने राज्यभरात खळबळ उडवली आहे. सुरुवातीला अपघात मानल्या गेलेल्या या घटनेत आता हत्या झाल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. दरम्यान, केतनचे काका दिनेश अग्रवाल यांनी या प्रकरणासंदर्भात काही धक्कादायक माहिती समोर आणली असून, सिया गोयल आणि केतन यांच्या नात्याबाबत महत्त्वाचे खुलासे केले आहेत.
वाढदिवसाच्या निमित्ताने लोहगडावर जाण्याचा आग्रह :
दिनेश अग्रवाल (Dinesh Agrawal) यांनी सांगितले की, 19 जून रोजी सिया गोयल (Siya Goyal) हिचा वाढदिवस असल्याने त्याआधी मित्रांसोबत सेलिब्रेशन करण्याचा कार्यक्रम आखण्यात आला होता. या कार्यक्रमासाठी केतन अग्रवाल (Ketan Agrawal) याला लोहगड (Lohagad) येथे येण्याचा आग्रह करण्यात आला. सुरुवातीला केतन जाण्यास फारसा उत्सुक नव्हता, मात्र सियाच्या आग्रहामुळे तो या सहलीत सहभागी झाला.
लोहगडावर गेल्यानंतर सियाकडून फोन आला आणि केतन खाली पडल्याची माहिती देण्यात आली, असेही त्यांनी सांगितले. अमेरिकेतून उच्च शिक्षण पूर्ण करून परतलेला केतन अत्यंत समजूतदार आणि शांत स्वभावाचा होता. त्यामुळे तो अशा प्रकारे दरीत कसा पडू शकतो, याबाबत कुटुंबीयांना सुरुवातीपासूनच शंका होती. पोलिसांच्या तपासानंतर या प्रकरणामागे पूर्वनियोजित कट असल्याची शक्यता पुढे आली.
Ketan Agrawal Case | साखरपुड्यापासून लग्नापर्यंत सर्व काही सुरळीत होते :
दिनेश अग्रवाल यांनी पुढे सांगितले की, मुलगा-मुलगी पाहण्याच्या कार्यक्रमातच सियाने केतन पसंत असल्याचे स्पष्ट सांगितले होते. त्यानंतर दोन्ही कुटुंबांच्या संमतीने 19 फेब्रुवारी रोजी साखरपुडा पार पडला होता. तसेच 25 नोव्हेंबर रोजी विवाहसोहळा आयोजित करण्यात आला होता. त्यामुळे सियाच्या मनात लग्नाबाबत कोणतीही नाराजी असू शकते, असा विचार कुटुंबीयांच्या मनात कधीच आला नव्हता.
त्यांनी असा दावाही केला की, सियाच्या कोणत्याही प्रेमसंबंधांची माहिती कुटुंबीयांना नव्हती. जर अशा प्रकारची माहिती आधी मिळाली असती, तर हे लग्न पुढे गेले नसते. मार्च आणि एप्रिल महिन्यात केतन आणि सिया यांच्यात काही किरकोळ वाद होत असल्याचे दिसले होते. मात्र अशा छोट्या मतभेदांना सामान्य बाब समजून दुर्लक्ष करण्यात आले. दोघेही एकत्र फिरत होते, कार्यक्रमांना उपस्थित राहत होते आणि सर्व काही सुरळीत असल्याचे दिसत होते. त्यामुळे कोणालाही संशय आला नाही. केतनच्या मृत्यूप्रकरणात जे कोणी सहभागी असतील, त्यांच्यावर कठोर कारवाई व्हावी, अशी मागणीही त्यांनी केली.






