Maharashtra Rain Alert | राज्यात मान्सूनने पुन्हा जोर पकडण्यास सुरुवात केली असून अनेक भागांमध्ये पावसाची तीव्रता वाढताना दिसत आहे. गेल्या दोन दिवसांपासून विविध जिल्ह्यांत पावसाच्या सरी कोसळत आहेत. दरम्यान, हवामान विभागाने कोकणासह राज्यातील अनेक भागांसाठी पुढील काही दिवस सतर्कतेचा इशारा जारी केला आहे. 24 ते 28 जून या कालावधीत काही ठिकाणी अतिवृष्टी होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
कोकण किनारपट्टीवर अतिवृष्टीची शक्यता :
रत्नागिरी (Ratnagiri) जिल्ह्यासह संपूर्ण कोकण पट्ट्यात आज सकाळपासून जोरदार पाऊस सुरू आहे. अरबी समुद्र (Arabian Sea) आणि किनारी भागांमध्ये मान्सूनची स्थिती अधिक सक्रिय झाल्याने पावसाचा वेग वाढला आहे. हवामान तज्ज्ञांच्या मते, किनारपट्टी परिसरात अतिवृष्टीस अनुकूल ढगांची निर्मिती होत असून त्यामुळे काही भागांमध्ये मुसळधार पाऊस कोसळण्याची शक्यता आहे.
गेल्या 24 तासांत रत्नागिरी जिल्ह्यात सरासरी 46 मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. यामध्ये रत्नागिरी तालुक्यात सर्वाधिक 91 मिलिमीटर, तर गुहागर (Guhagar) तालुक्यात 76 मिलिमीटर पाऊस झाला आहे. याशिवाय किनारपट्टी भागात जोरदार वारे वाहण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. आज आणि उद्या समुद्र खवळलेला राहण्याची शक्यता असल्याने मच्छीमार आणि नागरिकांना सावध राहण्याचा सल्ला देण्यात आला आहे.
Maharashtra Rain Alert | विदर्भात मान्सूनची प्रगती, पश्चिम महाराष्ट्रातही पावसाचा अंदाज :
पावसाचा वाढता प्रभाव लक्षात घेऊन हवामान विभागाने रत्नागिरी जिल्ह्यासाठी येलो अलर्ट जारी केला आहे. काल रात्रीपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे काही नद्यांच्या पाणीपातळीत वाढ झाली आहे. किनारी भागांमध्ये तयार होत असलेल्या पावसाळी प्रणालीमुळे 24 ते 28 जूनदरम्यान अतिवृष्टीची शक्यता अधिक असल्याचे हवामान विभागाने स्पष्ट केले आहे.
दुसरीकडे, गेल्या काही दिवसांपासून रखडलेला मान्सून आता विदर्भात (Vidarbha) पुढे सरकला आहे. नागपूर (Nagpur) प्रादेशिक हवामान विभागाच्या माहितीनुसार सध्या गडचिरोली (Gadchiroli), चंद्रपूर (Chandrapur), वर्धा (Wardha), वाशीम (Washim) आणि यवतमाळ (Yavatmal) जिल्ह्यांमध्ये मान्सून पोहोचला आहे. पुढील दोन ते तीन दिवसांत तो संपूर्ण विदर्भ व्यापण्याची शक्यता आहे. यंदा मान्सूनला सुमारे दहा दिवसांचा विलंब झाला असून 8 ते 21 जूनदरम्यान त्याची प्रगती थांबली होती. अल निनो (El Nino) परिणामामुळे अनुकूल परिस्थिती निर्माण होत नव्हती. मात्र आता पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भातील अनेक भागांमध्ये मान्सून सक्रिय झाला आहे. पुढील सहा ते सात दिवस पश्चिम महाराष्ट्रात चांगल्या पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला असून पूर्व आणि पश्चिम विदर्भात हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.






