Uddhav Thackeray | “शिवसेना आता जमीनदोस्त होणार,” या भाजप नेते गिरीश महाजन यांच्या वक्तव्यावर आता ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे. ‘सामना’ला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी गिरीश महाजन आणि भाजपवर जोरदार टीका केली असून, “शिवसेना जमिनीची दोस्त आहे, म्हणून ती संपवता येत नाही,” असा विश्वास व्यक्त केला.
“तुम्ही जमीनशत्रू आहात!” – ठाकरे यांचा घणाघात :
गिरीश महाजन (Girish Mahajan) यांच्या ‘शिवसेना संपतेय’ या वक्तव्यावर भाष्य करताना उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) म्हणाले, “आमचे पाय जमिनीवर आहेत. आमचा पक्ष हा असा वृक्ष आहे ज्याच्या मुळा खोलवर मातीत रुजलेल्या आहेत. त्यामुळे आम्हाला कोणीही उखडून टाकू शकत नाही. उलट तुम्ही जमीनशत्रू आहात. मुंबईसह महाराष्ट्रातील जमिनी मोदींच्या मित्रांच्या घशात घालायचा प्रयत्न करता, हे आम्हाला मान्य नाही.”
या वक्तव्याद्वारे उद्धव ठाकरेंनी भाजपवर गौतम अडाणी (Gautam Adani) यांच्या संदर्भात अप्रत्यक्षपणे निशाणा साधला असून, सरकारच्या शहरविकास धोरणांवरही प्रश्न उपस्थित केले आहेत.
Uddhav Thackeray | “शिवसेनेचं नाव कोणीही हिसकावू शकत नाही” – निवडणूक आयोगावर टीका :
शिवसेनेचं नाव व चिन्ह याबाबतही उद्धव ठाकरेंनी निवडणूक आयोगावर थेट टीका केली. “निवडणूक आयोगाने चिन्ह दुसऱ्याला दिलं, ही लोकशाहीची थट्टा आहे. पण ‘शिवसेना’ हे नाव कुणालाही देता येणार नाही. ते माझ्या वडिलांनी आणि आजोबांनी दिलं आहे. उद्या मी जर निवडणूक आयुक्ताचे नाव ‘धोंड्या’ ठेवलं, तर चालेल का? तसंच हेही अशक्य आहे,” असा सवाल करत त्यांनी निवडणूक आयोगाच्या निर्णयक्षमतेवरच प्रश्नचिन्ह उपस्थित केलं.
त्यांनी पुढे म्हटलं की, “जनतेला आमच्यापासून तोडण्याचे प्रयत्न झाले तरी ते आजवर यशस्वी झालेले नाहीत. त्यामुळे आता काही नेत्यांनी मालकांच्या चरणी लोटांगण घालणं, हाच शेवटचा मार्ग उरला आहे.”






