Uddhav Thackeray | दिल्ली (Delhi) येथील जंतरमंतर (Jantar Mantar) येथे सुरू असलेल्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी महत्त्वाची भूमिका मांडली आहे. 20 जुलै रोजी होणाऱ्या देशव्यापी आंदोलनाला त्यांनी पाठिंबा जाहीर करत सर्व पक्षांच्या नेत्यांनी आणि नागरिकांनी पक्षीय भूमिका बाजूला ठेवून या आंदोलनाला साथ द्यावी, असे आवाहन केले.
आंदोलनाला पाठिंबा; सोनम वांगचूक यांच्याशीही संवाद :
दिल्लीतील जंतरमंतरवर गेल्या 14 दिवसांपासून सीजेपी (CJP) च्या नेतृत्वाखाली आंदोलन सुरू असून, पर्यावरण कार्यकर्ते आणि शिक्षणतज्ज्ञ सोनम वांगचूक (Sonam Wangchuk) आमरण उपोषण करत आहेत. उपोषणामुळे त्यांची प्रकृती खालावत असल्याची माहिती समोर आल्यानंतर उद्धव ठाकरे यांनी त्यांच्याशी दूरध्वनीवर संवाद साधल्याचे सांगितले. देशाला त्यांच्या ज्ञानाची आणि अनुभवाची गरज असल्याने त्यांनी उपोषण थांबवावे, अशी विनंती आपण केल्याचेही ठाकरे यांनी स्पष्ट केले.
पत्रकार परिषदेत बोलताना उद्धव ठाकरे यांनी 20 जुलैच्या आंदोलनाबाबत आपली भूमिका मांडली. प्रत्येकाने प्रत्यक्ष मोर्चात सहभागी व्हावे, अशी सक्ती नसली तरी जिथे आहात तिथून आंदोलनाला पाठिंबा द्यावा, असे त्यांनी सांगितले. देशभर विविध ठिकाणी आंदोलन उभारले गेले तर सरकारवर दबाव निर्माण होईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. आवश्यक वाटल्यास आपण स्वतः दिल्लीत जाऊन आंदोलनात सहभागी होऊ, असेही त्यांनी नमूद केले. अभिजीत दीपके (Abhijit Deepke) यांच्या नेतृत्वाखाली सुरू असलेली चळवळ कोणत्याही राजकीय पक्षाचा झेंडा न घेता सुरू असल्याचे सांगत, त्यांच्या भूमिकेला पाठिंबा असल्याचे ठाकरे यांनी स्पष्ट केले.
Uddhav Thackeray | सर्व पक्षांना सहभागी होण्याचे आवाहन :
उद्धव ठाकरे यांनी 20 जुलैच्या आंदोलनात विविध राजकीय पक्षांच्या नेत्यांनीही सहभागी व्हावे, असे आवाहन केले. राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी या आंदोलनात सहभागी व्हावे, अशी अपेक्षा व्यक्त करत त्यांनी भाजप (Bharatiya Janata Party) च्या नेत्यांनाही या आंदोलनाला पाठिंबा देण्याचे आवाहन केले. पक्षीय मतभेद बाजूला ठेवून तरुणांच्या मागे उभे राहणे ही काळाची गरज असल्याचे ते म्हणाले. प्रत्यक्ष उपस्थित राहणे शक्य नसल्यास आपल्या-आपल्या ठिकाणी निदर्शने करून आंदोलनाला समर्थन द्यावे, असेही त्यांनी सांगितले.
संजय राऊत (Sanjay Raut) यांनी अभिजीत दीपके यांचा पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्यासोबतचा फोटो सामाजिक माध्यमांवर शेअर केल्यानंतर निर्माण झालेल्या चर्चेवरही उद्धव ठाकरे यांनी भाष्य केले. दीपके यांनी त्याबाबत स्पष्टीकरण दिल्यानंतर निर्माण झालेला संभ्रम दूर झाल्याचे त्यांनी सांगितले. संसदेचे पावसाळी अधिवेशन 20 जुलैपासून सुरू होत असून, या आंदोलनाशी संबंधित मुद्दे संसदेत जोरदारपणे मांडले जातील, असेही त्यांनी नमूद केले. तसेच भाजपच्या खासदारांना उद्देशून, “तुमच्यात माणुसकीचा अंश असेल तर या आंदोलनात सहभागी व्हा,” असे आवाहनही त्यांनी केले.






