Raj-Uddhav Thackrey | महाराष्ट्रामध्ये हिंदी भाषेच्या सक्तीविरोधात वातावरण तापले असून, विविध राजकीय पक्षांनी या मुद्द्यावर ठाम भूमिका घेतली आहे. या पार्श्वभूमीवर, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून (मनसे) हिंदी सक्तीविरोधात एकच आणि एकत्र मोर्चा काढण्याचा प्रस्ताव ठाकरे गटाच्या शिवसेनेला देण्यात आला होता. दोन स्वतंत्र मोर्चे न काढता एकत्र येऊन लढा देण्याचा मनसेचा आग्रह होता. आता याच संदर्भात एक मोठी अपडेट समोर आली आहे.
संजय राऊतांची मोठी घोषणा
हिंदी सक्तीविरोधात एकच आणि एकत्र मोर्चा निघेल, असे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी म्हटले आहे. त्यांनी ‘एक्स’ या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर एक ट्विट करत ही माहिती दिली आहे, ज्यामुळे आता राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे दोन्ही ठाकरे बंधू या मोर्च्यात एकत्र दिसण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
संजय राऊत यांनी ‘महाराष्ट्रातील शाळांत हिंदी सक्ती विरोधात एकच आणि एकत्र मोर्चा निघेल! जय महाराष्ट्र!’ असे ट्विट करतानाच उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांचा एकत्र फोटोही पोस्ट केला आहे. राज ठाकरे यांनीही उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांच्यासोबत या मोर्चासंबंधी चर्चा केल्याची माहिती मिळत आहे. आपण सर्वच राजकीय पक्षांसोबत बोलणार, असे राज ठाकरे यांनी कालच म्हटले होते, आणि त्यानंतर आता संजय राऊत यांचे हे ट्विट समोर आले आहे. यामुळे दोन्ही ठाकरे बंधू हिंदी सक्तीविरोधातील मोर्च्यामध्ये एकत्र दिसण्याची दाट शक्यता आहे.
ठाकरे बंधू एकत्र येणार
ठाकरे बंधू एकत्र येणार अशी चर्चा गेल्या अनेक दिवसांपासून राजकीय वर्तुळात होत असून, त्याची पहिली झलक कदाचित हिंदी सक्तीविरोधातील या मोर्च्यामधून दिसू शकते. ५ जुलै रोजी या मोर्च्याचे आयोजन करण्यात आले आहे. सुरुवातीला ६ जुलैची घोषणा करण्यात आली होती, मात्र त्यानंतर ५ जुलै ही मोर्चाची तारीख निश्चित करण्यात आली आहे. या मोर्च्यात राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे दोन्ही ठाकरे बंधू नेतृत्व करताना दिसू शकतात. त्याचसोबत, इतरही राजकीय पक्षातील नेते या मोर्चात सहभागी होण्याची शक्यता आहे, ज्यामुळे हा मोर्चा अधिक व्यापक होईल.
या घडामोडींवर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाचे खासदार अरविंद सावंत यांनी प्रतिक्रिया दिली आहे. “मराठीच्या मुद्द्यापेक्षा माझा अहंकार मोठा नाही,” असे मनसे प्रमुख राज ठाकरे म्हणाले होते. “मराठीचे हित, महाराष्ट्राचे हित जे करतील आणि महाराष्ट्राचे अहित जे करतील त्यांना सोडून आपण उभे राहिले पाहिजे,” असे उद्धव ठाकरे म्हणाले होते. “मुखात एक आणि प्रत्यक्षात एक असे वागणे असलेल्यांपासून सावध राहिले पाहिजे,” असेही त्यांनी म्हटले होते. “आज महाराष्ट्राला मराठी माणसाच्या एकजुटीची अतिशय गरज आहे, तमाम मराठी माणसांनी एकत्र आले पाहिजे,” अशी भावना सावंत यांनी व्यक्त केली.
मनसे नेते संदीप देशपांडे यांनीही यावर आपले मत मांडले. “महाराष्ट्राच्या मराठी माणसाची ताकद ही एकत्रितपणे दिसणे आवश्यक आहे. ज्या पद्धतीने महाराष्ट्रावर हिंदीची सक्ती लादण्याचा प्रयत्न होतोय, महाराष्ट्रात राहूनच मराठी भाषेची गळचेपी करण्याचा प्रयत्न होत असेल, तर मराठी म्हणून आपण सर्वांनी एकत्र अंगावर जाणे महत्त्वाचे आहे, गरजेचे आहे,” ही भूमिका काल राज ठाकरे यांनी मांडली. त्या भूमिकेला सर्वांनीच प्रतिसाद दिला आहे, त्यादृष्टीने पडलेले हे महत्त्वाचे पाऊल आहे, असे संदीप देशपांडे म्हणाले.
महाराष्ट्रतील शाळांत हिंदी सक्ती विरोधात एकच आणि एकत्र मोर्चा निघेल!
जय महाराष्ट्र! pic.twitter.com/A8ATq2ra0k— Sanjay Raut (@rautsanjay61) June 27, 2025






