तुळजाभवानी मातेच्या दर्शनासाठी नवीन नियम लागू! वाचा सविस्तर

On: June 19, 2026 2:17 PM
Tuljabhavani Temple (1)
---Advertisement---

Tuljabhavani Temple | महाराष्ट्राची कुलस्वामिनी मानल्या जाणाऱ्या तुळजाभवानी मातेच्या दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांसाठी मोठा दिलासादायक निर्णय घेण्यात आला आहे. तुळजाभवानी मंदिरात सशुल्क आणि व्हीआयपी दर्शन व्यवस्था कायमस्वरूपी बंद करण्यात आली असून, यापुढे सर्व भाविकांना समान पद्धतीने एकाच रांगेतून दर्शन घेता येणार आहे.

समान दर्शन व्यवस्थेला प्राधान्य :

तुळजाभवानी मंदिर ट्रस्ट (Tuljabhavani Temple Trust) प्रशासनाने दर्शन प्रक्रियेत समानता आणि पारदर्शकता आणण्यासाठी हा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. याआधी मंदिरात 200 रुपये आणि 500 रुपये शुल्क भरून विशेष दर्शनाची सुविधा उपलब्ध होती. या सुविधेअंतर्गत स्वतंत्र मार्गाचा वापर करून काही भाविकांना देवीच्या मूर्तीचे जवळून दर्शन घेण्याची संधी दिली जात होती.

मात्र, या व्यवस्थेमुळे सामान्य रांगेतील भाविकांना दीर्घकाळ प्रतीक्षा करावी लागत होती. विशेषतः सण-उत्सव आणि सुट्ट्यांच्या काळात तासनतास रांगेत उभ्या असलेल्या भाविकांचा खोळंबा होत असल्याच्या तक्रारी वाढल्या होत्या. या पार्श्वभूमीवर मंदिर प्रशासनाने सशुल्क दर्शनासाठी असलेले स्वतंत्र मार्ग बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयाचे भाविकांकडून स्वागत करण्यात येत असून, श्रीमंत आणि सर्वसामान्य असा भेदभाव दूर होणार असल्याची भावना व्यक्त केली जात आहे.

Tuljabhavani Temple | अंबाबाई मंदिरातील दर्शनावर निर्बंध :

नव्या नियमांनुसार, यापुढे कोणत्याही भाविकाला विशेष प्राधान्य दिले जाणार नाही. सर्वांना एकाच रांगेतून समान अंतरावरून तुळजाभवानी मातेचे दर्शन घ्यावे लागणार आहे. या बदलामुळे दर्शन प्रक्रिया अधिक सुलभ होईल आणि भाविकांना कमी वेळेत दर्शन घेता येईल, असा विश्वास मंदिर प्रशासनाने व्यक्त केला आहे. मात्र, देणगी किंवा शुल्काच्या माध्यमातून होणाऱ्या इतर धार्मिक सेवांच्या वेळापत्रकात कोणताही बदल करण्यात आलेला नसल्याचेही स्पष्ट करण्यात आले आहे.

दरम्यान, करवीर निवासिनी श्री अंबाबाई मंदिर (Ambabai Temple) प्रशासनानेही महत्त्वाची सूचना जारी केली आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा (Amit Shah) यांच्या कोल्हापूर (Kolhapur) दौऱ्यामुळे शनिवारी सकाळी 8 ते दुपारी 12.30 या वेळेत मंदिरातील दर्शन व्यवस्था बंद ठेवण्यात येणार आहे. अमित शहा यांच्या हस्ते मंदिर संवर्धन, प्रदक्षिणा मार्ग आणि राम मंदिर जतन व विकासकामांचा शुभारंभ केला जाणार आहे. या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर मंदिर परिसरात कडक सुरक्षा व्यवस्था लागू करण्यात आली असून, फेरीवाले, मंडप आणि तात्पुरते स्टॉल हटवण्यात आले आहेत. तसेच सुरक्षेच्या कारणास्तव परिसरातील दुकाने बंद ठेवण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

News title : Tuljabhavani VIP Darshan Ends

Sonal.K

Sonal Kothimbire

Join WhatsApp Group

Join Now