Valentines Day | प्रेम आणि नातेसंबंधाचा सण म्हणून ओळखला जाणारा व्हॅलेंटाईन डे जगभरात साजरा केला जात असताना, महाराष्ट्रात एका वेगळ्याच चर्चेला उधाण आले आहे. महिला हक्कांसाठी लढणाऱ्या कार्यकर्त्या तृप्ती देसाई (Trupti Desai) यांनी त्यांच्या सोशल मीडिया पोस्टद्वारे धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांना खास संदेश दिला आहे. या पोस्टमध्ये त्यांनी मुंडे यांच्या पहिल्या पत्नी करुणा मुंडे (Karuna Munde) यांच्या न्यायासाठीच्या लढ्याचा उल्लेख करत, त्यांना मोठ्या मनाने स्वीकारण्याचे आवाहन केले आहे. (Valentines Day)
करुणा मुंडेंच्या हक्कासाठी तृप्ती देसाईंची मागणी
तृप्ती देसाई यांनी आपल्या पोस्टमध्ये करुणा मुंडे आणि त्यांच्या मुलांचा उल्लेख करत, त्यांना कायदेशीर न्याय मिळावा यासाठी आवाज उठवला आहे. धनंजय मुंडे यांनी पहिल्या पत्नीला कोणतीही पूर्वसूचना न देता दुसरे लग्न केले, त्यानंतर करुणा मुंडेंना अनेक अडचणींना सामोरे जावे लागले. त्या दोन वेळा तुरुंगातही जाऊन आल्या, ही बाब अत्यंत खेदजनक असल्याचे देसाई यांनी म्हटले आहे.
निवडणुकीच्या प्रतिज्ञापत्रात धनंजय मुंडे यांनी आपल्या मुलांचा उल्लेख केला असला, तरी त्यांच्या आईचा उल्लेख पत्नी म्हणून केलेला नाही. यामुळे केवळ कायदेशीर बाबीच नव्हे, तर एक प्रकारे निवडणूक आयोगाची फसवणूक होत असल्याचाही मुद्दा त्यांनी मांडला आहे.
“करुणा मुंडेंना परळीला घेऊन या” – तृप्ती देसाईंचे आवाहन
व्हॅलेंटाईन डे हा नातेसंबंध सुदृढ करण्याचा दिवस आहे. अशा वेळी, तृप्ती देसाई यांनी या निमित्ताने धनंजय मुंडेंना करुणा मुंडेंचा स्वीकार करण्यास सांगितले आहे. त्यांनी म्हटले आहे की, “तुम्हाला मानणारा मोठा चाहता वर्ग महाराष्ट्रात आहे. त्यांनीही आपल्या पत्नीशी कसे वागावे, याचा सकारात्मक संदेश मिळावा.”
सध्या तृप्ती देसाई यांची ही पोस्ट सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असून, यावर विविध प्रतिक्रिया उमटत आहेत. राजकीय आणि सामाजिक वर्तुळातही या चर्चेने वेगळेच वळण घेतले आहे. आता धनंजय मुंडे या आवाहनाला काय उत्तर देतात, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. (Valentines Day)
Title : Trupti Desai Valentines Day Message to Dhananjay Munde






