Top Crime Thriller Series | सध्या ओटीटीची क्रेझ वाढत चालली आहे. प्रेक्षकांचा ओटीटीकडे कल वाढत चालल्याचं पाहायला मिळत आहे. त्यामुळे वेगवेगळ्या जॉनरचे मूव्ही-सीरीज सतत येत असतात. घरी बसल्या प्रेक्षकांना याचा आनंद लुटता येतो. तुम्हाला क्राईम थ्रिलरची आवड असेल तर अशाच एक सीरीजविषयी जाणून घेऊया.
क्राईम थ्रिलर मालिकांचे चाहते असाल, तर तुमच्यासाठी एक दमदार पर्याय उपलब्ध आहे. The Wire ही मालिका तिच्या प्रभावी कथानकामुळे प्रेक्षकांना खिळवून ठेवते. IMDb वर ९.३ इतके उच्च रेटिंग मिळवलेल्या या शोमध्ये अमेरिकेतील वास्तवाचे गडद पैलू दाखवले गेले आहेत.
बाल्टिमोरच्या वास्तवाचा वेध
ही मालिका अमेरिकेतील बाल्टिमोर शहरात घडणाऱ्या घटनांवर आधारित आहे. माजी पोलिस रिपोर्टर David Simon यांनी तयार केलेल्या या कथेत शहरातील विविध व्यवस्थांचा बारकाईने अभ्यास केला आहे. आतापर्यंत पाच सीझन प्रदर्शित झाले असून प्रत्येक भागात वेगवेगळ्या क्षेत्रांवर लक्ष केंद्रित करण्यात आले आहे.
पहिल्या सीझनमध्ये अमली पदार्थांचा व्यवसाय आणि पोलिसांची भूमिका उलगडली जाते, तर दुसऱ्या सीझनमध्ये बंदर परिसर आणि कामगारांच्या समस्या दाखवल्या आहेत. तिसऱ्या भागात राजकारण आणि प्रशासनाचा प्रभाव दिसतो, चौथ्या सीझनमध्ये शैक्षणिक व्यवस्था तपासली जाते, आणि पाचव्या सीझनमध्ये माध्यमांच्या जगावर प्रकाश टाकण्यात आला आहे.
वास्तववादी मांडणी आणि वेगळा अंदाज
या मालिकेची खासियत म्हणजे तिची अत्यंत वास्तववादी शैली. कथा पाहताना माहितीपटासारखा अनुभव येतो. पोलिस, ड्रग्स माफिया, राजकीय नेते आणि शाळा व्यवस्था यांच्यातील परस्पर संबंध अत्यंत प्रभावीपणे दाखवले गेले आहेत, जे प्रेक्षकांना विचार करायला भाग पाडतात.
इतर मालिकांप्रमाणे येथे केवळ गुन्ह्यांचे निराकरण दाखवले जात नाही. या कथेत पार्श्वसंगीताचा वापरही टाळण्यात आला आहे आणि कथानक हळूहळू उलगडत जाते. सुरुवातीचे काही भाग थोडे संथ वाटू शकतात, कारण पात्रांची पार्श्वभूमी सविस्तरपणे मांडली जाते. तसेच, स्थानिक बोलीभाषेमुळे सबटायटल्सची गरज भासू शकते. तरीही, थ्रिलर आणि अॅक्शन आवडणाऱ्यांसाठी ही मालिका नक्कीच पाहण्यासारखी आहे.






