मराठी माध्यमातील उल्लेखनीय योगदानासाठी ‘थोडक्यात’ला (Thodkyaat) महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या वतीने सन्मानित करण्यात आले आहे. मीरज, सांगली (Miraj, Sangli) येथे पार पडलेल्या राज्यस्तरीय अधिवेशनात उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांच्या हस्ते हा प्रतिष्ठेचा पुरस्कार प्रदान करण्यात आला.
‘थोडक्यात’चा राज्यस्तरीय गौरव
मराठी डिजीटल माध्यमात ठसा उमटवणाऱ्या ‘थोडक्यात’ या न्यूज पोर्टलच्या कार्याची दखल महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ (Maharashtra Rajya Marathi Patrakar Sangh, Mumbai) यांच्या वतीने घेण्यात आली. डिजिटल माध्यमासाठीचा पुरस्कार ‘थोडक्यात’ला प्रदान करण्यात आला. थोडक्यातचे संस्थापक कृष्णा वर्पे (Krishna Varpe) यांनी हा सन्मान स्वीकारला.
सांगली येथे १० एप्रिल रोजी आयोजित राज्यस्तरीय डिजीटल मीडिया अधिवेशनात हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुण्यांमध्ये उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे, खासदार विशाल पाटील, आमदार गोपिचंद पडळकर, ज्येष्ठ पत्रकार अशोक वानखेडे, पत्रकार संघाचे राज्य संघटक संजय भोकरे आणि डिजीटल मीडिया विभागाचे प्रदेशाध्यक्ष सिद्धार्थ भोकरे यांचा समावेश होता.
पत्रकारांच्या भूमिकेवर मंत्र्यांचे गौरवोद्गार
या कार्यक्रमात बोलताना चंद्रकांत पाटील यांनी पत्रकारांच्या मेहनतीचे कौतुक केले. त्यांनी सांगितले की, पत्रकार एका बातमीसाठी रात्रंदिवस परिश्रम घेतात आणि त्यांचे प्रश्न सोडविण्यासाठी आपण कायम प्रयत्नशील राहणार आहोत. त्याचबरोबर त्यांनी पत्रकारांना सकारात्मक बातम्यांना प्रोत्साहन देण्याचे आवाहन केले. आपल्या परिसरातील चांगल्या घडामोडींनाही प्रसिद्धी मिळायला हवी, असेही त्यांनी नमूद केले.
‘थोडक्यात’ व्यतिरिक्त महाराष्ट्र देशाचे (Maharashtra Desha) मनोज जाधव आणि महास्पोर्ट्सचे (Maha Sports) शरद बोदगे यांनाही डिजीटल मीडियामधील उल्लेखनीय योगदानासाठी पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं. याशिवाय पत्रकारितेत उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या पत्रकारांचाही यावेळी सन्मान करण्यात आला.








