केतन अग्रवाल हत्या प्रकरणात बीडचा तरुण अडकला! पोलीस तपासात खळबळजनक खुलासा

On: July 3, 2026 1:10 PM
Ketan Agarwal Case
---Advertisement---

Ketan Agarwal Case | केतन अग्रवाल (Ketan Agarwal) हत्या प्रकरणाच्या तपासात दररोज नवे धागेदोरे समोर येत असून आता आणखी एका तरुणाची भूमिका तपासाच्या केंद्रस्थानी आली आहे. मुख्य आरोपी चेतन चौधरी (Chetan Chaudhary) याचा वर्गमित्र असलेल्या या तरुणाला पुणे ग्रामीण पोलीस (Pune Rural Police) यांनी ताब्यात घेतले असून त्याच्याकडून महत्त्वाची माहिती मिळाल्याचा दावा केला जात आहे.

हत्येच्या कटाची नवी माहिती समोर :

तपासादरम्यान समोर आलेल्या माहितीनुसार, केतनच्या हत्येचा कट हा आधीपासूनच आखण्यात आला होता. पोलिसांच्या प्राथमिक तपासात आरोपी चेतन चौधरी आणि केतनची होणारी पत्नी सिया गोयल (Siya Goyal) यांनी या वर्गमित्रासमोर हत्येच्या योजनेवर चर्चा केल्याचे निष्पन्न झाल्याची माहिती समोर आली आहे. एवढेच नव्हे, तर 18 जून रोजी केतनला लोहगड (Lohgad Fort) येथे नेण्यापूर्वी या तरुणाला त्यांच्यासोबत येण्यासाठी वारंवार विनंती करण्यात आल्याचेही तपासातून स्पष्ट झाले आहे. मात्र काही कारणांमुळे तो त्या दिवशी त्यांच्यासोबत गेला नसल्याचे सांगितले जात आहे.

तपासातील आणखी एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे केतनला दरीत ढकलल्यानंतर चेतन चौधरी थेट याच वर्गमित्राला भेटण्यासाठी गेल्याची माहिती पोलिसांना मिळाली आहे. हत्येनंतर सर्वप्रथम याच तरुणाशी चेतनने संपर्क साधल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. तसेच मुख्य आरोपी सिया गोयल हिनेही या तरुणाशी संवाद साधल्याचे तपासात उघड झाले आहे. त्यामुळे या संपूर्ण प्रकरणात त्याची नेमकी भूमिका काय होती, याचा पोलीस सखोल तपास करत आहेत.

Ketan Agarwal Case | बीडच्या तरुणाची चौकशी सुरू :

पोलिसांनी ताब्यात घेतलेला हा संशयित तरुण मूळचा बीड (Beed) जिल्ह्यातील असून सध्या पुण्यात वास्तव्यास आहे. बालेवाडी (Balewadi) परिसरातील एका नामांकित खासगी कंपनीत तो नोकरी करत असल्याची माहिती समोर आली आहे. मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यापासून त्याचा चेतन चौधरीशी सातत्याने संपर्क होता. त्यांच्यात नियमित संवाद होत असल्याचे तपासात आढळून आले असून याच कालावधीत केतनच्या हत्येचा कट रचला गेला, असा पोलिसांचा संशय आहे.

पुणे ग्रामीण पोलिसांनी या तरुणाची सध्या सखोल चौकशी सुरू आहे. प्राथमिक चौकशीत त्याने पोलिसांना अनेक बाबी सांगितल्याचे समोर आले आहे. त्याच्या म्हणण्यानुसार, चेतन आणि सिया हत्येचा विचार करत असताना आपण त्यांना “केतनचा खून करू नका, असे केल्यास गंभीर परिणाम भोगावे लागतील,” असा सल्ला दिला होता. मात्र, खुनाचा कट रचला जात असल्याची माहिती असूनही त्याने पोलिसांना याबाबत पूर्वकल्पना का दिली नाही, तसेच हत्येनंतर चेतन त्यालाच का भेटला, या प्रश्नांची उत्तरे शोधण्याचे काम तपास यंत्रणा करत आहे. या नव्या घडामोडींमुळे केतन अग्रवाल हत्या प्रकरणाच्या तपासाला आणखी एक महत्त्वाचे वळण मिळाले आहे.

News Title: Third Suspect Emerges In Ketan Agrwal Murder

Sonal.K

Sonal Kothimbire

Join WhatsApp Group

Join Now