Ketan Agarwal Case | पुणे (Pune) जिल्ह्यातील लोहगड (Lohgad) येथे घडलेल्या केतन अग्रवाल (Ketan Agarwal) हत्याप्रकरणात तपास अधिक तीव्र झाला आहे. या प्रकरणात केतनची होणारी पत्नी सिया गोयल (Siya Goyal) आणि तिचा प्रियकर चेतन चौधरी (Chetan Chaudhary) यांना अटक करण्यात आली असून, दोघांना पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. दरम्यान, या गुन्ह्यात आणखी एखाद्या व्यक्तीचा सहभाग आहे का, याचाही पोलीस सर्व बाजूंनी तपास करत आहेत.
तिसऱ्या संशयिताच्या भूमिकेचा तपास सुरू :
या प्रकरणाबाबत लोणावळा (Lonavala) येथील उपविभागीय पोलीस अधिकारी (DySP) गजानन टोम्पे (Gajanan Tompe) यांनी महत्त्वाची माहिती दिली आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार, तपासाचा भाग म्हणून सियाच्या पुण्यातील घराचा पंचनामा करण्यात आला आहे. तसेच या हत्याकांडात तिसरा आरोपी किंवा अन्य कोणाचा सहभाग होता का, याचा सर्व बाजूनी तपास सुरू असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. त्यामुळे तपास यंत्रणा केवळ अटक केलेल्या दोन्ही आरोपींपुरती मर्यादित न राहता इतर संभाव्य संशयितांचाही शोध घेत आहे.
सिया आणि चेतन यांची पोलीस कोठडी गुरुवारी संपत असल्याने त्यांना न्यायालयात हजर केले जाण्याची शक्यता आहे. त्यापूर्वी तपास अधिकारी अधिकाधिक पुरावे गोळा करण्याचा प्रयत्न करत असून, गुन्ह्याशी संबंधित प्रत्येक बाब बारकाईने पडताळून पाहिली जात आहे. या तपासातून आणखी काही महत्त्वाचे धागेदोरे मिळण्याची शक्यता पोलिसांकडून व्यक्त करण्यात येत आहे.
Ketan Agarwal Case | घटनास्थळांसह घराचीही तपासणी :
तपासादरम्यान आणखी एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. पोलिसांच्या तपासानुसार, पुण्यातील एरिया ३७ (Area 37) परिसरामागील टेकडीवर सिया आणि चेतन यांनी कथितपणे गुन्ह्याचा सराव केल्याचा संशय आहे. या अनुषंगाने पुणे ग्रामीण पोलिसांनी आरोपींना घटनांशी संबंधित विविध ठिकाणी नेऊन पंचनामा केला. गुन्ह्यापूर्वी आणि त्यानंतर सिया ज्या ठिकाणी गेली होती, त्या सर्व ठिकाणांची तपासणी करण्यात आली असून, संभाव्य पुरावे शोधण्याचे काम सुरू आहे.
याच तपासाचा भाग म्हणून पोलिसांनी सियाला तिच्या बिबवेवाडी (Bibwewadi) येथील घरीही नेले. तेथे तिचे कपडे, मोबाईल आणि इतर वस्तूंची तपासणी करून पंचनामा करण्यात आला. 18 जून रोजी घटना घडल्यानंतर कोणतेही पुरावे नष्ट करण्यात आले का, याचीही सखोल चौकशी करण्यात आली. दरम्यान, सिया आणि चेतन यांना पुन्हा न्यायालयात हजर करण्यात येणार असून, पुढील तपासासाठी पोलीस आणखी कोठडीची मागणी करणार का, याकडेही सर्वांचे लक्ष लागले आहे.






