Thane Traffic | ठाणे शहरात सुरू असलेल्या मेट्रो प्रकल्पांमुळे वाहतुकीवर मोठा परिणाम होत आहे. विशेषतः घोडबंदर मार्गावरील कापूरबावडी जंक्शन भागात मेट्रो चार प्रकल्पाच्या कामामुळे वाहतुकीत बदल करण्यात आले आहेत. 17 ऑगस्ट ते 10 सप्टेंबर या कालावधीत दररोज रात्री 11 ते पहाटे 5 वाजेपर्यंत हे बदल लागू राहतील.
सणासुदीच्या काळात रात्री प्रवास करणाऱ्या प्रवाशांना या बदलांमुळे मोठी गैरसोय होण्याची शक्यता आहे. पोलिसांनी नागरिकांना पर्यायी मार्गांचा वापर करण्याचे आवाहन केले आहे. (Thane Traffic Update)
मेट्रो चार प्रकल्पामुळे वाहतुकीत बदल :
वडाळा-घाटकोपर-कासारवडवली मार्गावर मेट्रो चार प्रकल्पाचे काम सुरू आहे. कापूरबावडी जंक्शन भागात मेट्रो मार्गिकेचे सिमेंट गर्डर उभारण्याचे काम होणार असल्याने मोठ्या क्रेन आणि यंत्रसामग्रीची उभारणी करण्यात येणार आहे.
यामुळे मुख्य मार्गावरील आणि उड्डाणपुलावरील वाहतुकीवर परिणाम होणार असल्याने वाहतुकीचा प्रवाह बदलण्यात आला आहे. या कामामुळे अवजड वाहनांसह हलक्या वाहनांचीही कोंडी होण्याची शक्यता आहे.
Thane Traffic | दररोज हजारो वाहनांची रहदारी :
घोडबंदर मार्ग हा ठाण्यासाठी महत्त्वाचा दुवा आहे. या मार्गावरून दररोज हजारो अवजड वाहने उरण जेएनपीएहून गुजरातच्या दिशेने जातात. याशिवाय परिसरात मोठ्या प्रमाणात नागरी वस्ती असल्याने हलक्या वाहनांची गर्दीही कायम असते.
म्हणून या कामादरम्यान वाहतुकीवर नियंत्रण ठेवण्यासाठी पोलिसांनी पर्यायी व्यवस्था केली आहे. (Thane Traffic Update)
कसे असतील वाहतुकीतील बदल? :
मुंबई आणि ठाणे शहरांतून माजिवडा पुलावरून घोडबंदरच्या दिशेने जाणाऱ्या सर्व वाहनांना ज्युपिटर वाय जंक्शन येथे प्रवेशबंदी करण्यात आली आहे. या वाहनांना कापूरबावडी चौक, नंदीबाबा, उड्डाणपुलाखालील मार्ग आणि ढोकाळी मार्गे वळवण्यात येणार आहे.
तसेच नागरिकांना पोखरण रोड क्रमांक दोन मार्गेही प्रवास करण्यास परवानगी देण्यात आली आहे. अत्यावश्यक सेवेतील वाहनांना मात्र या नियमांमधून सवलत दिली जाणार आहे.
पोलिसांचे आवाहन :
ठाणे वाहतूक पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हे बदल केवळ रात्री 11 ते पहाटे 5 या वेळेत लागू असतील. दिवसा नियमित वाहतूक सुरळीत सुरू राहील. नागरिकांनी अनावश्यक प्रवास टाळावा आणि पर्यायी मार्गांचा वापर करावा, असे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले आहे. (Thane Traffic News Update)
सणासुदीच्या काळात नागरिकांना होणारी गैरसोय लक्षात घेऊन पोलिसांनी अतिरिक्त मनुष्यबळ तैनात करण्याचाही निर्णय घेतला आहे.






