Tejasvi Ghosalkar | बहुचर्चित मुंबई महानगरपालिकेच्या (Mumbai Municipal Corporation) निवडणुकीच्या तोंडावर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाला मोठा राजकीय धक्का बसला आहे. वॉर्ड क्रमांक १ च्या माजी नगरसेविका तेजस्वी घोसाळकर यांनी ठाकरे गटाचा राजीनामा देत भारतीय जनता पक्ष (BJP) मध्ये जाहीर प्रवेश केला आहे. मुंबईतील भाजपच्या ‘वसंत स्मृती’ कार्यालयात हा पक्षप्रवेश सोहळा पार पडला. प्रवेशानंतर, तेजस्वी घोसाळकर यांनी माध्यमांशी संवाद साधताना आपल्या निर्णयामागील मुख्य कारणे स्पष्ट केली.
विकासाची कामे आणि पतीच्या हत्येचा मुद्दा-
तेजस्वी घोसाळकर (Tejasvi Ghosalkar) यांनी त्यांच्या भाजप प्रवेशामागे दोन महत्त्वाची कारणे दिली. सर्वात पहिले कारण म्हणजे, “माझ्या प्रभागात विकासाची कामे मार्गी लावण्यासाठी” त्यांनी हा निर्णय घेतला. दुसरे आणि तितकेच भावनिक कारण म्हणजे, “अभिषेकच्या हत्येप्रकरणी गती येण्यासाठी” मी भाजपात प्रवेश करत असल्याची माहिती त्यांनी दिली.
त्या पुढे म्हणाल्या की, माझ्या प्रभागाची कामे करण्यासाठी मी हा निर्णय घेतला आहे. मला खूप काही बोलायचं आहे, पण ते कसं बोलावं हे मला समजत नाहीये. मला विकासाची कामे करायची आहेत आणि माझी ही सर्व कामे देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) साहेब यांच्या सक्षम नेतृत्वाखाली पूर्ण होतील, अशी मी अपेक्षा व्यक्त करते.
न्याय आणि केसला गती देण्यासाठी भाजपात प्रवेश
आपल्या दिवंगत पतीच्या हत्येच्या प्रकरणावर बोलताना तेजस्वी घोसाळकर भावूक झाल्या. त्या म्हणाल्या की, अभिषेकची जी निर्घृण हत्या झाली, त्याबद्दल सीबीआयने जो तपास सुरू केला आहे, त्याला अधिक वेगवान पद्धतीने गती मिळावी. यातून मला आणि माझ्या कुटुंबाला न्याय मिळेल अशी आशा त्यांनी व्यक्त केली. २०१७ साली मी अभिषेकला मदत म्हणून राजकारणात प्रवेश केला होता. प्रभागात विकासाची कामे होत नसल्याने हा राजकीय निर्णय घेतला आहे.
भावनिक निर्णय आणि बाह्य दबावाचा नकार
“ज्या पक्षाने मला ओळख दिली, तो पक्ष आणि ठाकरे कुटुंब सोडणे माझ्यासाठी अत्यंत कठीण होते,” असेही त्यांनी स्पष्ट केले. तसेच, अभिषेकची केस न्यायालयात सुरू असून, तिला गती देण्यासाठी आणि प्रभागातील कामे मार्गी लावण्यासाठीच हा निर्णय घेतला आहे. हा निर्णय घेताना माझ्यावर कोणताही बाह्य दबाव नव्हता, असे त्यांनी जाहीरपणे सांगितले. “ज्याप्रमाणे मी शिवसेनेत काम करायचे, तसेच किंवा त्यापेक्षा जास्त मी भाजपमध्ये काम करेन,” अशी ग्वाही त्यांनी दिली आहे. त्यांच्या या प्रवेशामुळे आगामी मुंबई महापालिका निवडणुकीत राजकीय समीकरणे बदलण्याची शक्यता आहे.
News Title – Tejasvi Ghosalkar Joins BJP for Justice and Development






