‘…म्हणून तहव्वूर राणाला भारतात आणलं’; संजय राऊतांचा खळबळजनक दावा

On: April 11, 2025 12:48 PM
Tahawwur Rana, Sanjay Raut
---Advertisement---

Tahawwur Rana | 26/11 मुंबई दहशतवादी हल्ल्याच्या मास्टरमाइंड तहव्वूर हुसैन राणा (Tahawwur Rana) याला अखेर भारतात प्रत्यार्पित करण्यात आले असून, त्याला तात्काळ फाशी देण्यात यावी अशी मागणी जोर धरत आहे. दरम्यान, शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी या प्रकरणावरून मोठा गौप्यस्फोट करत, राणाला भारतात आणण्यात आलं ते केवळ बिहार विधानसभा निवडणुकीसाठीच, असा दावा केला. या विधानामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.

राऊतांचा खळबळजनक दावा

राऊत म्हणाले की, तहव्वूर राणा याला फाशी देण्याच्या मागे निवडणुकीचा राजकीय हेतू आहे. बिहार विधानसभा निवडणुका वर्षअखेर होण्याची शक्यता असताना, केंद्र सरकारकडून या मुद्द्याचा निवडणुकीपूर्वी प्रचारासाठी वापर होणार आहे. तसेच, राणा भारतात आणण्यासाठी सुरू झालेली प्रक्रिया काँग्रेसच्या (Congress) कार्यकाळातच सुरू झाली होती, त्यामुळे सत्ताधारी पक्षाने याचे श्रेय घेऊ नये, असा टोला त्यांनी लगावला. राणा हा प्रत्यार्पित होणारा पहिला आरोपी नाही, यापूर्वी अबू सालेम (Abu Salem) यालाही अशाच प्रक्रियेतून भारतात आणण्यात आले होते, असेही त्यांनी नमूद केले.

नीरव मोदी, मेहुल चौकसी व कुलभूषण जाधवबाबत मागणी

याच अनुषंगाने बोलताना राऊत यांनी देशातील आर्थिक घोटाळ्यांमध्ये आरोपी असलेले नीरव मोदी (Nirav Modi) आणि मेहुल चौकसी (Mehul Choksi) यांचे प्रत्यार्पणही तत्काळ करावे, अशी मागणी केली. त्यांनी असेही स्पष्ट केले की, केवळ एका आरोपीला भारतात आणून मोठा विजय असल्याचे दाखवू नये.

याचवेळी राऊत यांनी माजी नौदल अधिकारी कुलभूषण जाधव (Kulbhushan Jadhav) यांचे प्रकरणही उपस्थित करत पाकिस्तानकडून झालेल्या अन्यायाविरोधात आक्रमक भूमिका घेतली. जाधव यांना 2016 मध्ये इराणमधून पळवून पाकिस्तानात नेण्यात आले व तिथे त्यांच्यावर हेरगिरीचा आरोप लावून लष्करी न्यायालयात फाशीची शिक्षा सुनावण्यात आली. हे संपूर्ण प्रकरण पाकिस्तानच्या भारतविरोधी कटाचा भाग असल्याचे राऊत म्हणाले.

जाधव यांना परत आणण्यासाठी केंद्र सरकारने आंतरराष्ट्रीय न्यायालयात याचिका दाखल केली असून, या लढ्याला आणखी बळ द्यावे आणि त्यांच्या सुटकेसाठी प्रयत्नांची शिकस्त करावी, अशी मागणी संजय राऊत यांनी केली. तसेच, तहव्वूर राणाच्या मुद्द्यावर कोणीही राजकीय श्रेय घेऊ नये, हे स्पष्ट करत त्यांनी केंद्रावर अप्रत्यक्ष टोला लगावला.

Title: Tahawwur Rana’s Hanging Linked to Bihar Polls?

 

Babita Durande

Babita Durande

Join WhatsApp Group

Join Now