Sushma Andhare | राज्यातील राजकारणात सध्या आरोप-प्रत्यारोपांची मालिका सुरू असतानाच शिवसेनेच्या नेत्या सुषमा अंधारे (Sushma Andhare) यांनी विरोधकांवर जोरदार टीका केली आहे. राजकीय टीका करताना कुटुंबीयांना लक्ष्य करणे योग्य नसल्याचे सांगत त्यांनी काही नेत्यांना थेट इशाराही दिला. राजकारणात मतभेद असले तरी काही मर्यादा पाळल्या गेल्या पाहिजेत, असे त्यांनी स्पष्ट केले.
अंधारे म्हणाल्या की, युद्धालाही काही नियम असतात आणि त्या नियमांनुसार कुटुंबीयांवर हल्ले केले जात नाहीत. त्यांनी सांगितले की, त्यांनी अनेकदा एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्यावर राजकीय टीका केली आहे, मात्र त्यांच्या पत्नी लता शिंदे किंवा कुटुंबीयांबद्दल कधीही एक शब्द काढलेला नाही. हा नियम त्यांनी सर्व नेत्यांबाबत पाळल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
नीलम गोऱ्हे आणि म्हात्रेंवर टीका :
विधानपरिषदेच्या पार्श्वभूमीवर काहीजण स्वतःला शिंदे यांचे निकटवर्तीय असल्याचे दाखवण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोपही अंधारे यांनी केला. सभागृहात नीलम गोऱ्हे (Nilam Gorhe) आणि बाहेर काही नेते अशा प्रकारचे राजकारण करत असल्याचा त्यांनी टोला लगावला.
अंधारे यांनी पुढे सांगितले की, चौथ्या-पाचव्या फेरीतील महिलांनीही तुम्हाला मागे टाकून किल्ला सर केला आहे. तसेच नीलम गोऱ्हे यांनी पुण्यातील शिवसेनेची संघटना कमकुवत केली असल्याचा आरोप करत त्यांनी पक्ष बांधणीवर बोलावे, असा सल्लाही दिला.
Sushma Andhare | पाणी प्रश्न आणि शस्त्र परवान्याचा मुद्दा :
पाण्याच्या प्रश्नावर बोलताना अंधारे म्हणाल्या की, दारणा धरणातून मोरगावला पाणी देण्याचा निर्णय नियमांनुसारच झाला होता. एखाद्याने कायद्याने पाणी मागितले आणि अधिकाऱ्यांनी दिले तर त्यात मंत्री किंवा सरकारची चूक ठरत नाही, असे त्यांनी स्पष्ट केले. यावेळी त्यांनी माजी जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांचाही उल्लेख केला.
तसेच २०२४ मध्ये शस्त्र परवाना कसा देण्यात आला, त्या वेळी देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) हे गृहमंत्री होते, अशी आठवणही त्यांनी करून दिली. कुटुंबीयांवर बोलायचे असेल तर आम्हालाही खाली उतरायला भाग पाडू नका, असा इशारा देत त्यांनी विरोधकांना मर्यादा पाळण्याचे आवाहन केले.






