Suraj Chavan Resignation | लातूरमध्ये अखिल भारतीय छावा संघटनेच्या कार्यकर्त्यांना मारहाण केल्याप्रकरणी राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सूरज चव्हाण यांच्या अडचणी वाढल्या आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे अजित पवार गटाचे अध्यक्ष अजित पवार यांनी सूरज चव्हाण (Suraj Chavan Resignation) यांना पदाचा राजीनामा देण्याचे स्पष्ट आदेश दिले आहेत.
अजित पवारांचा कठोर निर्णय :
अजित पवार (Ajit pawar) यांनी सोमवारी सकाळी एका ट्वीटद्वारे या निर्णयाची अधिकृत घोषणा केली. त्यांनी म्हटलं, “काल लातूरमध्ये घडलेल्या अत्यंत गंभीर आणि निषेधार्ह घटनेच्या पार्श्वभूमीवर, मी राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सूरज चव्हाण यांना त्यांच्या पदाचा त्वरित राजीनामा द्यायच्या स्पष्ट सूचना दिल्या आहेत.”
पक्षाच्या मूल्यांच्या विरोधात जाऊन केले जाणारे वर्तन कोणत्याही स्थितीत स्वीकारले जाणार नाही, हेही त्यांनी स्पष्ट केलं.
Suraj Chavan Resignation | अजित पवारांनाच का घ्यावा लागला निर्णय? :
लातूरमध्ये घडलेल्या घटनेत सूरज चव्हाण छावाच्या कार्यकर्त्यांना मारहाण करताना स्पष्टपणे व्हिडिओत दिसत होते. ही घटना समोर आल्यानंतर मराठा संघटनांनी तीव्र संताप व्यक्त केला. तसेच छावा संघटना ही मराठा समाजातील प्रभावशाली संघटना असून आगामी स्थानिक निवडणुकांमध्ये त्यांची नाराजी पक्षासाठी घातक ठरू शकते. त्यामुळे अजित पवारांनी तातडीने कारवाई करत सूरज चव्हाण (Suraj Chavan Resignation) यांच्यावर निर्णायक पावलं उचललं.
दरम्यान, सूरज चव्हाण हे अजित पवार यांचे निकटवर्तीय मानले जातात. राष्ट्रवादी काँग्रेसमधील फुटीनंतर सुरुवातीच्या टप्प्यातच सूरज चव्हाण यांनी अजित पवार गटात प्रवेश केला होता. त्यामुळे त्यांच्यावर कारवाई होईल, यावर अनेकांना शंका होती. मात्र पक्षाची प्रतिमा वाचवण्यासाठी आणि मराठा संघटनांचा रोष थोपवण्यासाठी अजित पवारांनी हा ठाम निर्णय घेतल्याचं बोललं जात आहे.






