सुनेत्रा पवारांच्या अध्यक्षपदावरुन वाद; राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये नेमकं चाललंय काय?

On: July 14, 2026 10:53 AM
Sunetra Pawar
---Advertisement---

Sunetra Pawar | राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष यांच्या राष्ट्रीय अध्यक्षा सुनेत्रा पवार (Sunetra Pawar) यांना पक्षातील एका पदाधिकाऱ्याने नोटीस बजावल्याने पक्षातील अंतर्गत मतभेद पुन्हा चर्चेत आले आहेत. या नोटीसमध्ये त्यांच्या अध्यक्षपदावरील नियुक्तीवरच प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आले असून, ती पक्षाच्या घटनेनुसार नसल्याचा दावा करण्यात आला आहे. या घडामोडीमुळे पक्षातील अंतर्गत संघर्ष पुन्हा उघड झाल्याचे मानले जात आहे.

नोटीसमागे आणखी कुणाचा हात आहे का?

पक्षाचे सचिव सच्चिदानंद सिंह (Sachchidanand Singh) यांनी ही नोटीस स्वतःच्या निर्णयाने पाठवली की यामागे इतर कोणत्या वरिष्ठ नेत्याचा सहभाग आहे, याची चौकशी केली जाणार असल्याचे पक्षातील वरिष्ठ नेतृत्वाने संकेत दिले आहेत. या संपूर्ण प्रकरणात आता पक्षाच्या शिस्तपालन समितीचे अध्यक्ष जय पवार (Jay Pawar) कोणती भूमिका घेतात, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

यापूर्वीही पक्षात प्रफुल्ल पटेल (Praful Patel) आणि सुनील तटकरे (Sunil Tatkare) यांच्या एका गटात, तर दुसऱ्या बाजूला सुनेत्रा पवार आणि पार्थ पवार (Parth Pawar) यांच्या नेतृत्वाभोवती मतभेद असल्याची चर्चा रंगली होती. त्यामुळे सध्याचा वाद हा त्या अंतर्गत संघर्षाचाच पुढचा टप्पा आहे का, अशी चर्चा सुरू झाली आहे. फेब्रुवारी महिन्यात प्रफुल्ल पटेल यांनी भारत निवडणूक आयोग (Election Commission of India) यांच्याशी केलेल्या पत्रव्यवहारानंतर, मार्चमध्ये सुनेत्रा पवार यांनी स्वतंत्र पत्र पाठवून तो पत्रव्यवहार रद्द केल्याचे कळवले होते. त्या पत्रात प्रफुल्ल पटेल यांचा उल्लेख केवळ राज्यसभेचे गटनेते म्हणून, तर सुनील तटकरे यांचा लोकसभेचे गटनेते म्हणून करण्यात आला होता.

अंतर्गत नाराजीची चर्चा पुन्हा रंगली

या घडामोडीनंतर पक्षातील काही वरिष्ठ नेत्यांनी शरद पवार (Sharad Pawar) यांची भेट घेतल्याची चर्चा यापूर्वी झाली होती. त्यांनी पक्षातील नव्या नेतृत्वाबाबत नाराजी व्यक्त करत, सुरू असलेल्या घडामोडींची माहिती शरद पवार यांच्यासमोर मांडल्याचे सांगितले जाते. तसेच पार्थ पवार आणि जय पवार यांना समज देण्याची विनंतीही करण्यात आल्याचे बोलले गेले होते.

मात्र, हा संबंधित पक्षाचा अंतर्गत विषय असल्याचे सांगत शरद पवार यांनी त्यात हस्तक्षेप करण्यास नकार दिल्याची माहिती सूत्रांकडून समोर आली होती. दरम्यान, प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे यांच्या पदांबाबत निर्माण झालेला संभ्रम अद्याप दूर झालेला नाही. निवडणूक आयोगाशी यासंदर्भात नव्याने पत्रव्यवहार झाला आहे की नाही, याबाबतही अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही. त्यामुळे सुनेत्रा पवार यांच्या अध्यक्षपदावर आक्षेप घेणाऱ्या या नोटीसमागे वरिष्ठ पातळीवरील कोणाचा सहभाग आहे का, याचा शोध पक्ष नेतृत्व घेत असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. आता या संपूर्ण प्रकरणात शिस्तपालन समितीचे अध्यक्ष जय पवार कोणता निर्णय घेतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

News Title: Sunetra Pawar Dispute over leadership position in NCP Internal Conflict

Join WhatsApp Group

Join Now