Sonu Nigam | बेंगळुरूमधील एका कॉन्सर्टदरम्यान गायक सोनू निगमने केलेल्या वक्तव्यामुळे मोठा वाद निर्माण झाला आहे. ‘पहलगाम’ हल्ल्याशी संबंधित तुलना करत केलेल्या भाष्यामुळे संतापाचा भडका उडाला, परिणामी FIR दाखल झाला आणि अखेर सोनूने माफी मागितली आहे. (Sonu Nigam)
वादग्रस्त विधानामुळे सोनू निगम ट्रोल
सोनू निगमने बेंगळुरू (Bengaluru) येथील कार्यक्रमात गाणी सादर करताना, एका चाहत्याच्या मागणीवरून वादग्रस्त विधान केलं. कन्नड भाषेत गाणं म्हणण्याचा आग्रह एका चाहत्याने केला होता. यावरूनच गायकाने पहलगाम हल्ल्याचा संदर्भ देत एक विधान केले होते. ‘हेच कारण आहे पहलगाममध्ये जे काही झालं त्यासाठी…’ असं सोनु निगमने म्हटलं. ‘पहलगाममध्ये जेव्हा पँट उतरवण्यात आली तेव्हा कुणी भाषा विचारली नव्हती…’ असंही सोनु निगम म्हणाला होता.
या वक्तव्यामुळे केवळ सोशल मीडियावरच नव्हे तर कर्नाटकमधील (Karnataka) जनतेमध्येही संताप व्यक्त करण्यात आला. इतकंच नव्हे तर स्थानिक पोलीस ठाण्यात सोनू निगमविरोधात (Sonu Nigam) FIR देखील नोंदवण्यात आला.
सोनू निगमची अखेर माफी
वाद पेटल्यानंतर सोनू निगमने (Sonu Nigam) अखेर सोशल मीडियावरून माफी मागितली. त्याने आपल्या पोस्टमध्ये लिहिलं, “मला माफ करा कर्नाटक… तुमच्यासाठी माझं प्रेम माझ्या ईगोपेक्षा अधिक आहे… मी तुमच्यावर प्रचंड प्रेम करतो…” ही पोस्ट सध्या जोरदार व्हायरल होत असून चाहत्यांकडून त्यावर प्रतिक्रिया दिल्या जात आहेत.
त्याने व्हिडीओद्वारे स्पष्टीकरण देताना असंही म्हटलं की, “कन्नड लोक फार चांगले आहेत. पण प्रत्येक ठिकाणी काही वाईट प्रवृत्ती असतात. गायकाला धमकावून गाणं गाण्यास भाग पाडणं चुकीचं आहे.”
Title: Sonu Nigam Apologizes After Controversial Pahalgam Remark






