“माझे उपोषण सुरूच राहणार!”, सोनम वांगचुक यांचा निर्धार; केंद्र सरकारकडे केली ‘ही’ मोठी मागणी

On: July 20, 2026 7:58 PM
Sonam Wangchuk
---Advertisement---

Sonam Wangchuk | दिल्ली येथे सुरू असलेल्या कॉकरोच जनता पार्टीच्या आंदोलनादरम्यान शिक्षणतज्ज्ञ आणि पर्यावरणवादी कार्यकर्ते सोनम वांगचुक (Sonam Wangchuk) यांनी आपले अन्नत्याग आंदोलन सुरूच ठेवण्याची घोषणा केली आहे. रुग्णालयात उपचार सुरू असतानाच त्यांनी सरकारसमोर महत्त्वाची मागणी मांडली असून, तरुणांना खासदारांशी भेटण्याची परवानगी मिळेपर्यंत उपोषण मागे घेणार नसल्याची स्पष्ट भूमिका त्यांनी घेतली आहे.

खासदारांशी भेट होईपर्यंत उपोषण मागे नाही :

दिल्लीमध्ये सुरू असलेल्या कॉकरोच जनता पार्टीच्या आंदोलनाचा हा 23 वा दिवस आहे. 20 जुलै रोजी पक्षाने संसद मार्चची घोषणा केली होती. या आंदोलनात देशभरातून मोठ्या संख्येने तरुण सहभागी झाले. मात्र आंदोलकांनी संसद भवनाकडे जाऊ नये म्हणून मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला. या आंदोलनाची दखल विरोधी पक्षांनीही घेत सत्ताधाऱ्यांवर टीका केली.

सोनम वांगचुक यांच्यावर सध्या सफदरजंग रुग्णालय (Safdarjung Hospital) येथे उपचार सुरू आहेत. दरम्यान, संसदेकडे जाण्याचा प्रयत्न करणाऱ्या आंदोलकांना पोलिसांनी रोखल्याचा आरोप करण्यात आला आहे. काही ठिकाणी लाठीमार आणि अश्रुधुराचा वापर झाल्याचेही सांगितले जात आहे. या पार्श्वभूमीवर वांगचुक यांनी आपले अन्नत्याग आंदोलन सुरूच ठेवण्याचा निर्णय जाहीर केला. त्यांनी स्पष्ट केले की, त्यांच्या समर्थक तरुणांना संसद परिसरात खासदारांची भेट घेण्याची परवानगी मिळाली किंवा स्वतःला रुग्णालयात खासदारांशी चर्चा करण्याची संधी मिळाली, तरच उपोषणाचा पुनर्विचार केला जाईल.

Sonam Wangchuk | सरकारकडे जबाबदारी निश्चित करण्याची मागणी :

सोनम वांगचुक यांनी केंद्र सरकारकडे केंद्रीय शिक्षणमंत्री यांच्या जबाबदारीबाबत निर्णय घेण्याची मागणीही केली. आंदोलनादरम्यान तरुणांना चिथावणी देण्याचा प्रयत्न झाल्याचा आरोप करत त्यांनी, तरीही आंदोलनकर्त्यांनी शांततेचा मार्ग स्वीकारल्याचे सांगितले. तरुणांनी संयम राखल्यामुळे आपण प्रभावित झाल्याचे त्यांनी नमूद केले.

संसदेसमोर आंदोलनकर्त्यांना आपली भूमिका मांडण्याची संधी दिल्यासच या प्रश्नावर सकारात्मक तोडगा निघू शकतो, असे आवाहन त्यांनी पोलीस आणि केंद्र सरकारकडे केले. वांगचुक यांच्या या भूमिकेनंतर कॉकरोच जनता पार्टीचे आंदोलन आणखी तीव्र होणार का, या आंदोलनाला अधिक पाठिंबा मिळणार का आणि सरकार पुढे कोणती भूमिका घेणार, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.

News Title: Sonam Wangchuk Continues Hunger Strike

Sonal.K

Sonal Kothimbire

Join WhatsApp Group

Join Now