‘वागंचूक यांच्या पत्नीला पोलिसांनी…’; अभिजित दीपकेंचा मोठा दावा, दिल्लीच्या आंदोलनात नेमकं काय घडलं?

On: July 20, 2026 5:25 PM
Abhijeet Dipke
---Advertisement---

Abhijeet Dipke | दिल्ली येथील जंतर-मंतर परिसरात सुरू असलेल्या कॉकरोच जनता पार्टी (Cockroach Janta Party) च्या आंदोलनादरम्यान मोठा वाद निर्माण झाला आहे. आंदोलनाचे संस्थापक अभिजित दीपके (Abhijeet Dipke) यांनी पोलिसांवर गंभीर आरोप करत, सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचूक (Sonam Wangchuk) यांच्या पत्नीशी गैरवर्तन झाल्याचा दावा केला आहे. तसेच आंदोलकांवर लाठीचार्ज झाल्याचाही आरोप त्यांनी केला असून सरकारशी चर्चा होईपर्यंत आंदोलन सुरूच ठेवण्याचा निर्धार व्यक्त केला आहे.

संसद मार्चदरम्यान पोलिसांवर गंभीर आरोप :

केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान (Dharmendra Pradhan) यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी कॉकरोच जनता पार्टीने दिल्लीमध्ये मोठे आंदोलन सुरू केले आहे. गेल्या 22 दिवसांपासून सोनम वांगचूक यांचे उपोषण सुरू होते. त्यांच्यासोबत अभिजित दीपके यांचेदेखील उपोषण सुरू होते. उपोषणाची सांगता झाल्यानंतर आता संसद मार्चची घोषणा करण्यात आली असून देशभरातून मोठ्या संख्येने आंदोलक दिल्लीत दाखल झाले आहेत. संसदेकडे निघालेल्या या मोर्चाच्या पार्श्वभूमीवर कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी मोठ्या प्रमाणावर पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

तसेच अभिजित दीपके यांनी पोलिसांच्या कारवाईवर तीव्र आक्षेप घेतला. त्यांच्या म्हणण्यानुसार, सोनम वांगचूक यांच्या पत्नीला एका पुरुष पोलिसाने लाठीने मारण्याचा प्रयत्न केला. एवढेच नव्हे तर त्यांच्या केसांना धरून त्यांना ट्रकखाली ओढण्याचाही प्रयत्न करण्यात आल्याचा दावा त्यांनी केला. हा प्रकार पाहिल्यानंतर आंदोलकांनी पोलिसांना रोखले आणि महिलेशी अशा प्रकारचे वर्तन का केले जात आहे, असा प्रश्न उपस्थित केला. यावेळी संबंधित पोलिस अधिकाऱ्याने आंदोलकांना धमकीच्या स्वरात उत्तर दिल्याचाही आरोप दीपके यांनी केला.

Abhijeet Dipke | चर्चा होईपर्यंत आंदोलन सुरूच राहणार :

पोलिसांकडून नेमकी कारवाई का केली जात आहे, याचे कोणतेही कारण आम्हाला सांगितले जात नसल्याचेही अभिजित दीपके यांनी म्हटले. आंदोलक शांततेच्या मार्गाने बसून आंदोलन करत असून सरकारसोबत बैठक होईपर्यंत ते तेथून हलणार नसल्याची भूमिका त्यांनी स्पष्ट केली. असे असूनही पोलिसांनी आंदोलकांवर बळाचा वापर केल्याचा आरोप त्यांनी केला.

दीपके यांच्या दाव्यानुसार, पोलिसांच्या कारवाईत काही आंदोलक जखमी झाले असून अनेक युवकांच्या डोक्याला मार लागला आहे. तसेच महिला आंदोलकांवरही पुरुष पोलिसांनी लाठीचार्ज केल्याचा आरोप त्यांनी केला. सरकारकडून ठोस निर्णय किंवा चर्चा होत नाही तोपर्यंत आंदोलन अधिक तीव्र करण्यात येईल, असा इशाराही त्यांनी दिला. पोलिसांकडून गुंडगिरी केली जात असल्याचा आरोप करत त्यांनी आंदोलन सुरूच राहणार असल्याचे सांगितले. त्यामुळे दिल्लीतील या आंदोलनाची पुढील घडामोड काय होते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

News Title: Delhi Protest Dipke Makes Serious Claims

Sonal.K

Sonal Kothimbire

Join WhatsApp Group

Join Now