Sonam Raghuvanshi | इंदूरच्या राजा रघुवंशी हत्या प्रकरणात दररोज नवनवीन आणि धक्कादायक खुलासे समोर येत आहेत. नवविवाहित पती राजा रघुवंशीच्या हत्येचा कट रचल्याचा आरोप असलेली त्याची पत्नी सोनम रघुवंशीने, तिला जबरदस्तीने लग्न करण्यास भाग पाडल्यास ‘परिणाम भोगावे लागतील,’ अशी कुटुंबाला चेतावणी दिली होती, असे आता समोर आले आहे.
काय आहे प्रकरण?
समोर आलेल्या माहितीनुसार, राजाचा मोठा भाऊ विपिन रघुवंशी याने पोलिसांना सांगितले की, सोनमने (Sonam Raghuvanshi) लग्नापूर्वीच राज कुशवाहसोबतच्या तिच्या प्रेमसंबंधांबद्दल आपल्या आईला सांगितले होते. मात्र, राज कुशवाह (वय २०), जो तिच्या कुटुंबाच्या व्यवसायात अकाउंटंट म्हणून काम करत होता, त्याला तिच्या कुटुंबाने स्वीकारले नाही.
माध्यमांशी बोलत असताना विपिनने सांगितले की, सोनमने (Sonam Raghuvanshi) राजसोबतच्या तिच्या प्रेमसंबंधांबद्दल तिच्या आईला आधीच माहिती दिली होती. तिने राजाशी लग्न करायचे नाही असे सांगितले होते. मात्र, तिच्या आईने राजसोबतच्या संबंधांवर आक्षेप घेतला.” पुढे असेही म्हटलं आहे की, सोनमने नाईलाजाने राजाशी लग्न करण्यास होकार दिला, परंतु तिने कुटुंबाला गंभीर चेतावणी दिली होती. सूत्रांनी सांगितलं की, “विपिनने आरोप केला की, सोनम राजाशी लग्न करण्यास तयार झाली, परंतु तिने ‘तुम्ही काय परिणाम होतील ते पाहाल. तुम्हाला सर्वांना याचे परिणाम भोगावे लागतील,’ अशी चेतावणी दिली होती. तिने राजाला मारेल असे कोणीच विचार केले नव्हते.”
तीन पुरुषांच्या मदतीने हत्या-
सोनम आणि राजा, एक २९ वर्षीय वाहतूक व्यावसायिक, यांचा विवाह ११ मे रोजी इंदूरमध्ये झाला होता. अवघ्या काही दिवसांनंतर, मेघालयमध्ये त्यांच्या हनिमूनवर असताना, राजाची सोनमने राज आणि इतर तीन पुरुषांच्या मदतीने कथितपणे हत्या केली.
या प्रकरणातील एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने सांगितले की, “राज कुशवाहचा दावा आहे की, त्याला सोनमला पाठिंबा द्यायचा नव्हता आणि शेवटच्या क्षणी त्याने मेघालयला जाण्याचा आपला बेत रद्द केला. त्याने इतर तिघांनाही जाऊ नका असे सांगितले होते, परंतु सोनमने तिकीट बुक केल्यानंतर ते तिघे मेघालय पाहण्यासाठी गेले.” “शेवटच्या क्षणीही त्या तिघांनी राजाला मारण्यास नकार दिला, पण सोनमने आग्रह धरला आणि त्यासाठी १५ लाख रुपये देण्याचे आश्वासन दिले. पोलीस या दाव्यांची पडताळणी करत आहेत,” असेही त्या अधिकाऱ्याने सांगितले.






