गॅस ग्राहकांनो ‘या’ मोबाईल अ‍ॅप्सद्वारे घरबसल्या करा e-KYC!

On: August 7, 2026 12:31 PM
LPG e-KYC
---Advertisement---

LPG e-KYC | एलपीजी गॅस कनेक्शनधारकांसाठी आता e-KYC प्रक्रिया अनिवार्य करण्यात आली आहे. ही प्रक्रिया पूर्ण न केल्यास गॅस सिलेंडर बुकिंगमध्ये अडचणी येऊ शकतात किंवा बुकिंग रद्द होण्याची शक्यता आहे. मात्र, आता ग्राहकांना गॅस एजन्सीमध्ये जाण्याची आवश्यकता नसून विविध अधिकृत मोबाईल अॅप्स आणि संकेतस्थळाच्या माध्यमातून घरबसल्या काही मिनिटांत e-KYC पूर्ण करता येणार आहे.

मोबाईल अॅपवरून सहज पूर्ण करा e-KYC:

सरकारने e-KYC अनिवार्य करण्यामागील उद्देश एलपीजी सबसिडी आणि गॅस सिलेंडरचा लाभ पात्र ग्राहकांपर्यंतच पोहोचावा तसेच बनावट कनेक्शन आणि गैरव्यवहारांवर नियंत्रण मिळवणे हा आहे. e-KYC न केल्यास पुढील गॅस सिलेंडर बुकिंगमध्ये अडथळे निर्माण होऊ शकतात. काही प्रकरणांमध्ये एजन्सीकडून बुकिंग नाकारले जाण्याचीही शक्यता असल्याने ही प्रक्रिया वेळेत पूर्ण करणे आवश्यक आहे.

इंडियन ऑइलचे ग्राहक IndianOil One अॅप, भारत पेट्रोलियमचे ग्राहक HelloBPCL for Business अॅप आणि एचपी गॅसचे ग्राहक HP Pay अॅपच्या माध्यमातून e-KYC करू शकतात. ही सर्व अॅप्स Google Play Store वर मोफत उपलब्ध आहेत. प्रक्रिया सुरू करण्यापूर्वी आधार कार्डशी जोडलेला मोबाईल क्रमांक, एलपीजी ग्राहक क्रमांक आणि नोंदणीवेळी दिलेली माहिती जवळ ठेवणे आवश्यक आहे. त्यानंतर संबंधित अॅपमध्ये लॉगिन करून e-KYC पर्याय निवडावा आणि Aadhaar FaceRD अॅपच्या मदतीने फेस स्कॅन किंवा बायोमेट्रिक पडताळणी पूर्ण करावी. पडताळणी यशस्वी झाल्यानंतर e-KYC प्रक्रिया पूर्ण झाल्याचा संदेश मिळेल.

LPG e-KYC | वेबसाइट आणि हेल्पलाइनचाही पर्याय उपलब्ध :

ज्या ग्राहकांना मोबाईल अॅप वापरणे सोयीचे वाटत नाही, त्यांच्यासाठी संकेतस्थळाद्वारेही e-KYC करण्याची सुविधा उपलब्ध आहे. प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेच्या लाभार्थ्यांसह इतर ग्राहक PMUY च्या अधिकृत वेबसाइटवर जाऊन आवश्यक माहिती भरून e-KYC पूर्ण करू शकतात. त्यामुळे एजन्सीमध्ये वारंवार जाण्याची गरज राहत नाही आणि प्रक्रिया अधिक सोपी होते.

मोबाईल अॅप वापरताना नेटवर्क किंवा तांत्रिक अडचणी आल्यास ग्राहकांनी घाबरून जाऊ नये. अशा वेळी जवळच्या अधिकृत गॅस वितरकाकडे जाऊन बायोमेट्रिक पडताळणीद्वारे e-KYC पूर्ण करता येते. तसेच कोणतीही अडचण असल्यास 1800 2333 555 या हेल्पलाइन क्रमांकावर संपर्क साधून मार्गदर्शन मिळवता येते. त्यामुळे वेळेत e-KYC पूर्ण करून गॅस पुरवठा आणि सबसिडीचा लाभ सुरळीत सुरू ठेवण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

News Title: Complete LPG e-KYC From Home

Sonal.K

Sonal Kothimbire

Join WhatsApp Group

Join Now