Solapur News | पुण्याहून आलेल्या एका ४५ वर्षीय विवाहित महिलेने सोलापूर शहरातील एका लॉजमध्ये आपल्यावर लैंगिक अत्याचार करण्याचा प्रयत्न झाल्याची धक्कादायक तक्रार दाखल केली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे सदस्य आणि सोलापूरचे माजी महापौर मनोहर सपाटे यांच्यावर हे गंभीर आरोप आहेत. लॉजच्या रूममध्ये महिलेसोबत किळसवाणे कृत्य करतानाचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत असून, या घटनेमुळे सोलापूरच्या राजकीय आणि सामाजिक वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. सपाटे यांच्याविरुद्ध जबरदस्तीने लैंगिक अत्याचाराचा प्रयत्न करणे, विनयभंग आणि दमदाटी केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
लॉजमधील व्हिडीओ व्हायरल
मिळालेल्या माहितीनुसार, पीडित महिला पुणे येथे वास्तव्यास असून, सोलापूर जिल्ह्यातील एका गावात त्यांच्या शेतीच्या वादामुळे न्यायालयीन खटला सुरू आहे. या न्यायालयीन कामासाठी त्या वारंवार सोलापूरमध्ये वकिलांना भेटण्यासाठी येत असतात. १४ जून रोजी पीडित महिला माजी महापौर मनोहर सपाटे यांच्या मालकीच्या शिवपार्वती लॉजमध्ये राहिल्या होत्या. सुरुवातीचे दोन दिवस त्यांनी रूम नंबर २०२ मध्ये वास्तव्य केले, तर त्यानंतरच्या दोन दिवसांसाठी त्या रूम नंबर २०५ मध्ये शिफ्ट झाल्या होत्या.
“तुम्ही माझ्या वडिलांसारखे आहात”
या घटनेचा सर्वात धक्कादायक भाग १६ जूनच्या मध्यरात्री १२ वाजताच्या सुमारास घडला, जेव्हा राष्ट्रवादीचे नेते आणि माजी महापौर मनोहर सपाटे यांनी लॉजमधील पीडित महिलेच्या रूमचा दरवाजा ठोठावला आणि आत घुसून तिच्यावर जबरदस्ती करण्याचा प्रयत्न केला. पीडित महिलेशी त्याने अश्लील हावभाव करत विनयभंग केला. घाबरलेल्या महिलेने “तुम्ही माझ्या वडिलांसारखे आहात, असे का करता?” असे विचारले, तेव्हा आरोपीने अर्वाच्च भाषेत शिवीगाळ करत, “तू कुठेही तक्रार केली, तरीही मला काही फरक पडत नाही, कारण माझे वय जास्त असल्यामुळे मला जामीन मिळतो,” असे सांगत तिला दमदाटी केली, ज्यामुळे पीडितेला अधिक भीती वाटू लागली.
संशयित आरोपी मनोहर सपाटे याने यापूर्वीही अनेकदा मोबाईलवरून संपर्क साधत पीडितेशी शारीरिक संबंध ठेवण्याचा आग्रह करत होता. या सततच्या त्रासाला आणि धमक्यांना कंटाळून पीडित महिला २४ जून रोजी ॲड. योगेश पवार यांचा सल्ला घेण्यासाठी सोलापूरमध्ये आल्या होत्या. त्याचवेळी पीडितेला सपाटेचा फोन आला आणि त्याने लॉजवरील रूम नंबर ३०७ वर येण्याचा आग्रह केला. या संधीचा फायदा घेऊन पीडितेने ‘स्टिंग ऑपरेशन’ करण्याचे ठरवले.
२४ जून रोजी संध्याकाळी पीडितेने रूम नंबर ३०७ मध्ये जाऊन सपाटेच्या किळसवाण्या कृत्याचे व्हिडिओ काढले. त्या व्हिडिओत सपाटे हा पीडितेसोबत अश्लील कृत्य करताना स्पष्टपणे दिसून येत आहे. या व्हिडिओतील पुराव्याच्या आधारे २५ जून रोजी फौजदार चावडी पोलीस ठाण्यात लेखी तक्रार दाखल करण्यात आली. त्यानुसार मनोहर सपाटे याच्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला असून, पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.






