Ketan Agrawal Murder | केतन अग्रवाल (Ketan Agrawal) हत्या प्रकरणात आणखी एक महत्त्वाचा दावा समोर आला आहे. सिया गोयल (Siya Goyal) हिने लोहगड (Lohgad) येथे जाण्यासाठी आग्रह केला होता, अशी चर्चा सुरू असताना आता तिची आई पूजा गोयल (Pooja Goyal) यांनी याला स्पष्टपणे विरोध केला आहे. व्हिडिओ कॉल आणि मोबाईल चॅटच्या आधारे त्यांनी वेगळीच माहिती मांडल्याने या प्रकरणाने नवे वळण घेतले आहे.
व्हिडिओ कॉलमधील संभाषणाचा दावा :
या प्रकरणावर प्रथमच माध्यमांसमोर भूमिका मांडताना पूजा गोयल यांनी सांगितले की, लोहगडावर ट्रेकिंगला जाण्याचा आग्रह सियाने केला नव्हता. त्यांच्या म्हणण्यानुसार, घटनेच्या आदल्या दिवशी सिया आणि केतन यांच्यात व्हिडिओ कॉलवर संवाद सुरू होता. त्याच वेळी केतनची आई देखील त्या कॉलमध्ये सहभागी झाली होती. त्या संवादादरम्यान सियाने केतनच्या आईला, “केतन लोहगडावर ट्रेकिंगला जाण्याचा आग्रह करत आहे. कृपया त्याला जाण्यास मनाई करा. मला ट्रेकिंगला जायचे नाही. दुसऱ्या दिवशी वाढदिवसाचा कार्यक्रम असल्यामुळे मला विश्रांती घ्यायची आहे,” असे सांगितल्याचा दावा त्यांनी केला.
पूजा गोयल यांनी पुढे सांगितले की, त्यावेळी केतनच्या आईनेच सियाला लोहगडावर जाण्याचा सल्ला दिला होता. याशिवाय मोबाईलवरील चॅटमध्येही सियाने स्वतःला ट्रेकिंगला जायचे नसल्याचे स्पष्टपणे लिहिले होते, असे त्या म्हणाल्या. मात्र, केतननेच लोहगडावर जाण्याचा आग्रह कायम ठेवला होता, असा त्यांचा ठाम दावा आहे. त्यामुळे यापूर्वी चर्चेत असलेल्या कथनाला आता वेगळे परिमाण मिळाले आहे.
Ketan Agrawal Murder | दोषींना कठोर शिक्षा व्हावी :
केतनच्या मृत्यूची माहिती मिळाल्यानंतर संपूर्ण कुटुंबाला मोठा धक्का बसल्याचे सांगताना पूजा गोयल भावूक झाल्या. केतनच्या कुटुंबाला जितके दुःख झाले आहे, तितकेच दुःख आम्हालाही झाले असल्याचे त्यांनी नमूद केले. या संपूर्ण प्रकरणातील जे कोणी दोषी असतील त्यांच्यावर कठोर कारवाई व्हावी, अशी मागणी त्यांनी केली. एवढेच नव्हे, तर जर या प्रकरणात स्वतःची मुलगी दोषी आढळली, तर तिलाही कठोर शिक्षा झाली पाहिजे, असे स्पष्ट शब्दांत त्यांनी सांगितले.
यावेळी त्यांनी सियाच्या कथित अफेअरबाबतही भूमिका मांडली. सियाचे कोणासोबत प्रेमसंबंध असल्याची माहिती आम्हाला कधीच नव्हती, असे त्यांनी स्पष्ट केले. केतन आणि सियामध्ये चांगले संबंध असल्याचेच आम्हाला वाटत होते. जर केतनला या संबंधांची माहिती होती, तर त्याने दोन्ही कुटुंबांना त्याबाबत कल्पना द्यायला हवी होती. त्याचप्रमाणे दुसऱ्या बाजूच्या कुटुंबीयांनीही आमच्याशी संवाद साधला असता, तर आम्ही सियाला समजावण्याचा प्रयत्न केला असता किंवा आवश्यक वाटल्यास हे लग्न मोडण्याचा निर्णय घेतला असता. योग्य वेळी ही माहिती समोर आली असती, तर आजची दुर्दैवी परिस्थिती निर्माण झाली नसती, असेही पूजा गोयल यांनी म्हटले.






