MPSC Exam 2027 | स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या राज्यातील लाखो विद्यार्थ्यांसाठी मोठा दिलासा देणारी बातमी समोर आली आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने (MPSC) परीक्षा पद्धतीत आतापर्यंतचा सर्वात मोठा बदल करण्याचा निर्णय घेतला आहे. नवीन प्रणालीअंतर्गत पूर्व परीक्षा वर्षातून तब्बल तीन वेळा घेण्यात येणार असून, मुख्य परीक्षेतील वैकल्पिक विषयाची पद्धतही रद्द करण्यात आली आहे. विद्यार्थ्यांवरील मानसिक ताण कमी करून त्यांना अधिक संधी उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने हा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला असून, ही नवी कार्यपद्धती 2027 पासून लागू होणार आहे.
सध्याच्या पद्धतीत पूर्व परीक्षा वर्षातून फक्त एकदाच होत असल्याने एका दिवसातील कामगिरीवर विद्यार्थ्यांचे संपूर्ण वर्ष अवलंबून राहत होते. आता मात्र एकाच वर्षात अनेक वेळा परीक्षा देण्याची संधी मिळणार असल्याने उमेदवारांना स्वतःची क्षमता सिद्ध करण्यासाठी अधिक संधी उपलब्ध होणार आहे.
वर्षातून तीन वेळा पूर्व परीक्षा, मुख्य परीक्षा मात्र एकदाच :
आयोगाच्या निर्णयानुसार महाराष्ट्र नागरी सेवा राजपत्रित गट-अ व गट-ब संयुक्त पूर्व परीक्षा, महाराष्ट्र गट-ब सेवा पूर्व परीक्षा आणि महाराष्ट्र गट-क सेवा पूर्व परीक्षा वर्षातून दोन किंवा त्यापेक्षा अधिक वेळा, म्हणजेच जास्तीत जास्त तीन वेळा घेतल्या जाणार आहेत. मात्र मुख्य परीक्षा पूर्वीप्रमाणेच वर्षातून केवळ एकदाच होईल.
याशिवाय वर्षभरात होणाऱ्या विविध पूर्व परीक्षांमध्ये पात्र ठरणाऱ्या सर्व उमेदवारांना त्या वर्षाच्या मुख्य परीक्षेसाठी पात्र मानले जाणार आहे. त्यामुळे एका परीक्षेतील अपयशामुळे संपूर्ण वर्ष वाया जाण्याची भीती मोठ्या प्रमाणात कमी होणार आहे.
MPSC Exam 2027 | वैकल्पिक विषय रद्द, ऑनलाइन CBT परीक्षा आणि नॉर्मलायझेशन लागू
नवीन बदलांमधील आणखी एक महत्त्वाचा निर्णय म्हणजे राज्य सेवा मुख्य परीक्षेतून वैकल्पिक विषय पूर्णपणे हटवण्यात आला आहे. यामुळे उमेदवारांना अतिरिक्त दोन पेपर द्यावे लागणार नाहीत आणि सर्व विद्यार्थ्यांसाठी समान स्पर्धात्मक वातावरण निर्माण होईल.
तसेच पारंपरिक ओएमआर शीटवर होणाऱ्या परीक्षा बंद करून संगणकाधारित ऑनलाइन (CBT) परीक्षा पद्धत लागू करण्यात येणार आहे. ऑनलाइन परीक्षेमुळे पारदर्शकता वाढण्याबरोबरच निकालही अधिक वेगाने जाहीर करता येणार असल्याचे आयोगाने स्पष्ट केले आहे.
पूर्व परीक्षा वेगवेगळ्या सत्रांमध्ये होणार असल्यामुळे सर्व उमेदवारांचे गुण न्याय्य पद्धतीने निश्चित करण्यासाठी नॉर्मलायझेशन पद्धत लागू केली जाणार आहे. यामुळे विविध सत्रांतील प्रश्नपत्रिकांच्या कठीणतेतील फरक लक्षात घेऊन गुणांचे समानीकरण केले जाईल.
एमपीएससीच्या परीक्षा नियंत्रक व सहसचिव सरिता बांदेकर-देशमुख यांनी दिलेल्या माहितीनुसार, ही सुधारित परीक्षा प्रणाली 2027 पासून पूर्णपणे लागू होईल. मुख्य परीक्षेसाठी उमेदवारांची पात्रता निश्चित करण्याबाबतची सविस्तर कार्यपद्धती आयोग लवकरच स्वतंत्र प्रसिद्धीपत्रकाद्वारे जाहीर करणार आहे.






