Ketan Agarwal Case | केतन अग्रवाल (Ketan Agarwal) हत्या प्रकरणात दररोज नवे खुलासे समोर येत असताना आता आरोपी सिया गोयल (Siya Goyal) हिच्या आईने प्रथमच माध्यमांसमोर भूमिका मांडली आहे. सियाच्या शिक्षणापासून ते तिच्या वैयक्तिक आयुष्याविषयी होत असलेल्या चर्चांवर त्यांनी स्पष्टीकरण देत काही महत्त्वाचे दावे केले आहेत.
सियाच्या शिक्षणाबाबत आधीच दिली होती माहिती :
18 जून रोजी लोहगड (Lohagad Fort) येथे घडलेल्या घटनेनंतर सुरुवातीला केतन अग्रवालचा मृत्यू अपघाती असल्याचे मानले जात होते. मात्र, पोलिस तपास पुढे सरकल्यानंतर हा पूर्वनियोजित खून असल्याचा संशय बळावला. तपासात सिया गोयल आणि तिचा मित्र चेतन चौधरी (Chetan Choudhary) यांनी केतनला दरीत ढकलल्याचा आरोप समोर आला. यापूर्वीही त्याच किल्ल्यावरून केतनला खाली ढकलण्याचा प्रयत्न झाल्याची माहिती तपासातून पुढे आली असून, त्यावेळी झाडाचा आधार मिळाल्याने त्याचा जीव वाचल्याचे सांगितले जात आहे. त्या प्रसंगी सियाने साप दिसल्यामुळे धक्का लागल्याचे कारण दिले होते. सध्या दोन्ही आरोपी पोलीस कोठडीत आहेत.
दरम्यान, सिया आणि चेतन यांच्या संबंधांची माहिती तिच्या आई-वडिलांना होती, असा आरोप होत असतानाच सियाच्या आईने याबाबत स्पष्टीकरण दिले. त्यांनी एका मुलाखतीत सांगितले की, सियाच्या शिक्षणासंदर्भात होत असलेल्या चर्चेत तथ्य आहे. सिया बारावी उत्तीर्ण झाली नव्हती, ही बाब त्यांनी लपवली नव्हती. उलट केतनच्या कुटुंबीयांना याबाबत साखरपुड्यापूर्वीच स्पष्ट माहिती देण्यात आली होती. त्यांच्या म्हणण्यानुसार, ही बाब माहित असूनही केतनच्या कुटुंबाकडून कोणताही आक्षेप घेण्यात आला नव्हता.
Ketan Agarwal Case | चेतनशी नात्याची माहिती नसल्याचा दावा :
सियाच्या आई-वडिलांनी मुलाखतीत पुढे सांगितले की, सिया आणि चेतन चौधरी यांच्यात कोणतेही प्रेमसंबंध असल्याची माहिती त्यांना नव्हती. जर अशा नात्याची कल्पना आधीच मिळाली असती, तर त्यांनी केतनच्या कुटुंबाची माफी मागून हे लग्न तातडीने थांबवले असते, असा दावा त्यांनी केला. त्यामुळे या प्रकरणात आपल्या कुटुंबाची कोणतीही भूमिका नसल्याचे त्यांनी स्पष्ट करण्याचा प्रयत्न केला.
दुसरीकडे, लोहगडावरील हत्या प्रकरणाच्या तपासाचा भाग म्हणून पोलिसांनी चेतन चौधरीचे घटनास्थळी रिक्रिएशन केले आहे. यापूर्वी सिया गोयलचेही रिक्रिएशन करण्यात आले होते. आरोपींनी दिलेल्या जबाबांमध्ये आणि प्रत्यक्ष घटनाक्रमात काही तफावत आहे का, याची पडताळणी करण्यासाठी ही प्रक्रिया करण्यात आली. या हत्याकांडाशी संबंधित प्रत्येक बाबीचा सखोल तपास पोलीस करत असून, तपासातून आणखी महत्त्वाची माहिती समोर येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.






