Omraje Nimbalkar | शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटातील सुरू असलेल्या राजकीय घडामोडींना वेग आला असून खासदार ओमराजे निंबाळकर (Omraje Nimbalkar) यांच्या भूमिकेकडे राज्याचे लक्ष लागले आहे. पक्षातील सहा खासदारांच्या बंडखोरीनंतर निर्माण झालेल्या राजकीय वातावरणात ओमराजे निंबाळकर यांनी पक्षाच्या मशाल चिन्हासंदर्भात महत्त्वपूर्ण वक्तव्य करत आपल्या मनातील नाराजी उघडपणे व्यक्त केली आहे.
बैठकांनंतर निर्णयाची उत्सुकता :
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाला अलीकडेच मोठा धक्का बसला असून पक्षातील सहा खासदारांनी बंडखोरीचा मार्ग स्वीकारला आहे. या पार्श्वभूमीवर पक्ष नेतृत्वाकडून नाराज नेत्यांना मनवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. त्याचाच एक भाग म्हणून पक्षातील वरिष्ठ नेत्यांनी ओमराजे निंबाळकर यांच्या पुणे (Pune) येथील निवासस्थानी मध्यरात्री भेट घेतल्याची माहिती समोर आली आहे.
यानंतर ओमराजे निंबाळकर धाराशिव (Dharashiv) येथे रवाना झाले असून ते आपल्या समर्थक आणि कार्यकर्त्यांसोबत चर्चा करणार आहेत. या बैठकीनंतर ते आपली पुढील राजकीय भूमिका जाहीर करण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. गेल्या तीन दिवसांत स्वतःबाबत नकारात्मक वातावरण निर्माण केल्याची खंत व्यक्त करत त्यांनी, “जर मी इतका वाईट असतो, तर जनतेने मला निवडून दिले नसते,” असे स्पष्टपणे सांगितले.
Omraje Nimbalkar | स्थानिक निवडणुकांतील पराभवावर प्रश्न :
भावनिक होत बोलताना ओमराजे निंबाळकर यांनी 20 वर्षांपूर्वी त्यांच्या वडिलांच्या हत्येनंतर कुटुंबावर आलेल्या संकटाची आठवण करून दिली. त्यांच्या वडिलांची हत्या ज्या दिवशी झाली तो दिवस शनिवार होता आणि अलीकडील घडामोडीही शनिवारीच घडल्याने जुन्या आठवणी पुन्हा ताज्या झाल्याचे त्यांनी नमूद केले.
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा उल्लेख करत त्यांनी आपल्या लोकसभा मतदारसंघातील नगरपालिका आणि पंचायत समित्यांमध्ये एकही जागा जिंकता आली नसल्याबद्दल प्रश्न उपस्थित केला. “मशाल” चिन्हावर निवडणूक लढवणाऱ्या कार्यकर्त्यांना पराभवाला सामोरे का जावे लागले, असा सवाल त्यांनी केला. मेहनती आणि निष्ठावान कार्यकर्त्यांना योग्य संधी मिळत नसल्याची खंतही त्यांनी व्यक्त केली. गुन्हेगारी पार्श्वभूमी नसलेल्या कार्यकर्त्यांनाही पराभव पत्करावा लागल्याचे त्यांनी सांगितले.






