Pune Water Crisis | पुणे (Pune) शहरात पाण्याची उपलब्धता कमी होण्याची शक्यता लक्षात घेऊन पुणे महानगरपालिका (Pune Municipal Corporation) प्रशासनाने पाणी वापराबाबत कठोर निर्बंध लागू केले आहेत. मान्सूनचा वेग अपेक्षेपेक्षा मंदावल्याने आणि धरणांमधील साठा मर्यादित राहण्याची शक्यता निर्माण झाल्यामुळे शहरात पाणी बचतीसाठी विशेष उपाययोजना राबविण्यात येत आहेत. नियमांचे पालन न करणाऱ्यांवर 10 हजार रुपयांपर्यंत दंड आकारण्याबरोबरच वारंवार उल्लंघन झाल्यास फौजदारी कारवाई करण्याचा इशाराही देण्यात आला आहे.
कमी पर्जन्यमानाचा अंदाज; प्रशासनाची तयारी :
शहरात सध्या एक दिवसाआड पाणीपुरवठा सुरू असताना पाणीटंचाईची परिस्थिती आणखी गंभीर होऊ नये यासाठी महापालिकेने व्यापक कृती आराखडा तयार केला आहे. भारतीय हवामान विभाग (IMD) यांनी 29 मे 2026 रोजी प्रसिद्ध केलेल्या सुधारित दीर्घकालीन अंदाजानुसार, देशात यंदा सरासरीपेक्षा कमी पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. तसेच अल-निनो (El Nino) परिस्थितीचा परिणाम पर्जन्यमानावर होऊ शकतो, असा इशाराही हवामान तज्ज्ञांनी दिला आहे. (Pune Water Crisis)
या पार्श्वभूमीवर पाण्याचा काटकसरीने वापर व्हावा यासाठी महापालिकेने विविध विभागांना सतर्कतेच्या सूचना दिल्या आहेत. शहरातील पाणीपुरवठा सुरळीत राखण्यासाठी आणि उपलब्ध जलसाठ्याचा योग्य वापर करण्यासाठी प्रशासनाने विशेष यंत्रणा कार्यान्वित केली असून प्रत्येक थेंब वाचवण्यावर भर दिला जात आहे.
Pune Water Crisis | पाणी अपव्ययावर निर्बंध :
महापालिकेच्या नव्या आदेशानुसार शहरातील सार्वजनिक तसेच खासगी वाहन धुलाई केंद्रे बंद ठेवण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्या संबंधितांवर 10 हजार रुपयांचा दंड आकारण्यात येणार आहे. याशिवाय सार्वजनिक आणि खासगी जलतरण तलाव, खासगी उद्याने तसेच बांधकाम प्रकल्पांसाठी पिण्याच्या पाण्याचा वापर करण्यास बंदी घालण्यात आली आहे.
नागरिकांनी वाहन धुणे, अंगण किंवा पदपथ स्वच्छ करण्यासाठी महापालिकेचे किंवा बोअरवेलचे पाणी वापरू नये, यासाठी जनजागृती मोहीम राबविण्यात येणार आहे. गृहनिर्माण सोसायट्यांसाठी सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प (STP) सुरू ठेवणे बंधनकारक करण्यात आले असून प्रक्रिया केलेले पाणी बागकाम, फ्लशिंग आणि इतर दुय्यम वापरासाठी वापरण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. घरगुती आणि व्यावसायिक पाण्याच्या टाक्यांवर ऑटोमॅटिक फ्लोट व्हॉल्व्ह बसविण्याचे आवाहन करण्यात आले असून टाकी ओव्हरफ्लो झाल्यास 10 हजार रुपयांचा दंड आकारला जाणार आहे.
महापालिकेने पाणीपुरवठा विभागाला अनधिकृत नळजोड, पाणीगळती आणि टँकरमधून होणारा अपव्यय रोखण्यासाठी विशेष मोहीम राबविण्याचे आदेश दिले आहेत. शहरात कुठेही पाणीगळती आढळल्यास त्वरित दुरुस्ती करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. एखाद्या व्यक्ती किंवा संस्थेवर दोनदा दंडात्मक कारवाई होऊनही नियमभंग सुरू राहिल्यास तिसऱ्या वेळी थेट फौजदारी गुन्हा दाखल करण्यात येणार आहे. यासाठी सर्व विभागांमध्ये नोडल अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात येणार असून दररोजच्या कारवाईचा अहवाल सादर करण्याचे निर्देशही देण्यात आले आहेत.






