Shrikant Shinde | परीक्षा सुधारणा विधेयकावर लोकसभेत सुरू असलेल्या चर्चेदरम्यान शिवसेना खासदार श्रीकांत शिंदे (Shrikant Shinde) यांनी नीट (NEET) परीक्षेच्या पद्धतीत बदल करण्याची गरज मांडली. विद्यार्थ्यांना वर्षातून अनेकदा परीक्षा देण्याची संधी मिळावी, अशी भूमिका त्यांनी मांडली. मात्र, भाषणादरम्यान विरोधी बाकावरील खासदाराच्या हस्तक्षेपामुळे सभागृहात काही काळ वातावरण तापले.
परीक्षा वर्षातून अनेकदा घेण्याची मागणी :
कॉकरोच जनता पार्टीचे आंदोलन संपल्यानंतर केंद्र सरकारने परीक्षा व्यवस्थेतील गैरप्रकार रोखण्यासाठी परीक्षा सुधारणा विधेयक लोकसभेत चर्चेसाठी मांडले आहे. परीक्षा आयोजित करण्याची पद्धत, नियम तसेच पेपरफुटी आणि अन्य गैरव्यवहारांसाठीच्या शिक्षांमध्ये बदल करण्याचा प्रस्ताव या विधेयकातून मांडण्यात आला आहे. या विधेयकावर सध्या सत्ताधारी आणि विरोधकांकडून जोरदार चर्चा सुरू आहे. विरोधक सरकारच्या धोरणांवर टीका करत असताना सत्ताधारी पक्षातील काही नेतेही विद्यमान परीक्षा व्यवस्थेत सुधारणा करण्याची आवश्यकता व्यक्त करत आहेत.
याच चर्चेत श्रीकांत शिंदे यांनी नीट परीक्षेच्या आयोजनाबाबत आपले मत मांडले. नीट परीक्षा सध्या वर्षातून एकदाच घेतली जाते. मात्र, अनेक विद्यार्थ्यांना विविध कारणांमुळे परीक्षेला उपस्थित राहता येत नाही. विशेषतः ग्रामीण आणि दुर्गम भागातील विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्रापर्यंत पोहोचताना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. एखाद्या कारणामुळे परीक्षा देता आली नाही तर विद्यार्थ्याचे संपूर्ण एक वर्ष वाया जाते. त्यामुळे नीटसारख्या परीक्षांचे आयोजन वर्षातून एकापेक्षा अधिक वेळा करता येईल का, याचा विचार करण्याची गरज असल्याचे शिंदे यांनी सांगितले. परदेशातील परीक्षा व्यवस्थेचे उदाहरण देताना त्यांनी अशा प्रकारच्या परीक्षा वर्षातून दोन किंवा त्याहून अधिक वेळा घेण्याची पद्धत असल्याचे नमूद केले.
Shrikant Shinde | भाषणादरम्यान राहुलवरून वाद :
श्रीकांत शिंदे यांनी अमेरिका (USA) तसेच इतर देशांमधील परीक्षा व्यवस्थेचा संदर्भ देताना विद्यार्थ्यांना अशा परीक्षा अनेकदा देण्याची संधी मिळते, असे सांगितले. परीक्षा दिल्यानंतर निकालही लवकर जाहीर होतो, मात्र महाविद्यालयांमध्ये प्रवेश प्रक्रिया वर्षातून एकदाच होते. विद्यार्थ्यांच्या सोयीसाठी अशा प्रकारची व्यवस्था भारतातही स्वीकारण्याचा विचार व्हायला हवा, असे मत त्यांनी व्यक्त केले.
मात्र, शिंदे यांचे भाषण सुरू असतानाच विरोधी बाकावरील एका खासदाराने मध्येच आक्षेप घेत काही बोलण्याचा प्रयत्न केला. यामुळे श्रीकांत शिंदे संतापले आणि त्यांनी, “अरे राहुल, तू ऐकून घे ना. का ओरडत आहेस?” अशा शब्दांत प्रतिक्रिया दिली. शिंदे यांनी ‘राहुल’ असे नाव घेतल्याने विरोधकांकडूनही आक्रमक प्रतिक्रिया उमटली. त्यानंतर आपण राहुल गांधी (Rahul Gandhi) यांच्याबद्दल बोलत नसून मागील बाजूला बसलेल्या राहुल पासवान (Rahul Paswan) यांना उद्देशून बोलत असल्याचे शिंदे यांनी स्पष्ट केले. हे सांगताना त्यांनी हसत परिस्थिती हलकी करण्याचा प्रयत्न केला. दरम्यान, नीटसह इतर परीक्षांबाबत श्रीकांत शिंदे यांनी सुचवलेल्या बदलांवर केंद्र सरकार पुढे काय भूमिका घेते, याकडे आता लक्ष लागले आहे.






