Rakhi Sawant | जम्मू-काश्मीरमधील पहलगाम (Pahalgam Attack) येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर अभिनेत्री राखी सावंतचा ‘जय पाकिस्तान’ म्हणतानाचा व्हिडीओ व्हायरल झाला. यावर प्रतिक्रिया देताना शिवसेना (शिंदे गट) आमदार संजय गायकवाड यांनी ‘राखी सावंतला गोळ्या घाला’ असे अत्यंत धक्कादायक वक्तव्य केले आहे.
बुलढाणा येथे पत्रकारांशी संवाद साधताना गायकवाड म्हणाले, “राखी सावंत देशद्रोही आहे, ती महिलांच्या नावावर कलंक आहे. भारतात खाते-पिते आणि पाकिस्तानची बाजू घेते. अशी व्यक्ती भारतात राहण्यास पात्र नाही.” हे वक्तव्य सध्या राजकीय आणि सामाजिक स्तरावर तीव्र प्रतिक्रिया निर्माण करत आहे.
‘देशद्रोह’ आणि ‘गोळ्या घाला’ – गंभीर आरोप :
संजय गायकवाड पुढे म्हणाले, “तिला इथे गोळ्या घाला आणि पाकिस्तानात गाडा. भारतात तिला येऊच देऊ नये.” त्यांनी राखीवर ‘देशद्रोह’ाचा आरोप करत, तिच्यावर कडक कारवाईची मागणी केली आहे. दरम्यान, सोशल मीडियावरही अनेकांनी राखी सावंतच्या वक्तव्यावर संताप व्यक्त केला असून, तिच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे. (Rakhi Sawant)
राखी सावंतने ‘जय पाकिस्तान’ म्हणत केलेला व्हिडीओ पहलगाम हल्ल्यानंतर वायरल झाला होता. त्यानंतर तिने हा व्हिडीओ मजेकरिता केला असल्याचं स्पष्टीकरण दिलं, पण तोपर्यंत तीव्र प्रतिक्रियांचा भडका उडालेला होता.
Rakhi Sawant | संजय गायकवाड यांची वादग्रस्त पार्श्वभूमी :
संजय गायकवाड हे एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना पक्षाचे आमदार आहेत. ते बुलढाणा शहर मतदारसंघातून निवडून आले असून याआधीही अनेक वेळा त्यांनी वादग्रस्त विधानं केली आहेत. काही काळापूर्वी त्यांनी राहुल गांधींविरोधातही आक्षेपार्ह विधान केलं होतं. (Shoot Rakhi Sawant)
राजकीय आणि सामाजिक वर्तुळात अशा प्रकारचं उघडपणे हिंसक वक्तव्य करणं हे लोकशाहीला अपमानित करणारं असून, याविरोधात कारवाईची मागणी जोर धरू लागली आहे.








