Swargate Rape Case | स्वारगेट ( Swargate Rape Case) एसटी बस स्थानकात २६ वर्षीय युवतीवर बलात्कार करणारा आरोपी दत्तात्रय गाडे (Dattatraya Gade) अद्याप फरार असून, पुणे पोलिसांनी त्याच्या शोधासाठी तपास अधिक वेगवान केला आहे. या प्रकरणात आता नवी धक्कादायक माहिती समोर आली आहे. पुणे पोलिसांनी दत्तात्रय गाडेच्या मैत्रिणीला चौकशीसाठी पाचारण केले असता, त्याने याआधीही महिलांना त्रास दिल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.
गाडेच्या मैत्रिणीने दिली धक्कादायक माहिती
पुणे गुन्हे शाखेच्या पथकांनी बुधवारी गाडेच्या काही मित्र-मैत्रिणींची सखोल चौकशी केली. विशेषत: भोर (Bhor) येथून आणलेल्या त्याच्या एका मैत्रिणीने दिलेल्या जबाबानंतर पोलिसांचा संशय अधिक वाढला आहे. तिने पोलिसांना सांगितले की, “दत्तात्रय गाडे सतत मला फोन आणि मेसेज करून त्रास देत असे. त्याला आणखी एका मुलीशी मैत्री करायची होती, त्यामुळे तो तिच्याशी पॅचअप करून दे किंवा भेट घालून दे, असा सतत तगादा लावत होता.” या माहितीवरून दत्तात्रय गाडेचा महिलांबाबतचा गैरवर्तनाचा इतिहास असू शकतो, असा संशय पोलिसांना आला आहे. त्यामुळे आता या प्रकरणाचा तपास अधिक खोलात नेण्यात येत आहे.
पुणे गुन्हे शाखेच्या पथकांनी बुधवारी रात्री उशिरापर्यंत दत्तात्रय गाडेच्या जवळच्या 10 मित्र-मैत्रिणींची चौकशी केली. या सर्वांकडून गाडेच्या वागणुकीबाबत माहिती घेतली जात आहे. तसेच, गाडे हा मूळचा शिरूर (Shirur) तालुक्यातील रहिवासी असल्याने पोलिसांनी त्याच्या घरी देखरेख ठेवण्यासाठी बंदोबस्त लावला आहे. याशिवाय, गाडेच्या आई-वडिलांना आणि भावाला देखील पुण्यात चौकशीसाठी बोलावण्यात आले आहे. पोलिसांना शक्यता आहे की, आरोपी त्याच्या नातेवाईकांच्या मदतीने लपून बसला असेल.
स्वारगेट बस स्थानकात दोन वेळा बलात्कार
या प्रकरणातील तपासानुसार, मंगळवारी पहाटे (ता. २५) दत्तात्रय गाडेने फलटणला जाणाऱ्या युवतीची फसवणूक करून तिला बसमध्ये नेले. त्याने तिला ही बस फलटणला जाते असे सांगितले. युवती बसमध्ये चढल्यानंतर त्याने दरवाजा बंद करून तिच्यावर दोन वेळा बलात्कार केला. ससून रुग्णालयाने (Sassoon Hospital) पोलिसांना दिलेल्या वैद्यकीय तपासणी अहवालानुसार, अत्याचाराची घटना स्पष्ट झाली आहे. पीडित तरुणी पुण्यात परिचारिका म्हणून काम करत होती आणि ती मंगळवारी फलटण (Phaltan) येथील आपल्या गावी जाण्यासाठी निघाली होती.
स्वारगेटसारख्या गजबजलेल्या ठिकाणी बसस्थानकात हा घृणास्पद गुन्हा घडल्याने राज्यभर संतापाची लाट उसळली आहे. पुणे पोलिसांनी आता तपास पथकांची संख्या वाढवत १३ पथके तयार केली असून, आरोपीचा शोध घेण्यासाठी वेगवेगळ्या ठिकाणी छापे टाकले जात आहेत. पोलिसांनी आरोपीला लवकरात लवकर अटक करून कठोर शिक्षा व्हावी, अशी मागणी जोर धरू लागली आहे.
Title: Shocking Details Emerge in Swargate Rape Case






