महाराष्ट्रातील ‘या’ जिल्ह्याचं नाव बदलणार? महिला आमदाराने केली मोठी मागणी

On: August 10, 2026 11:29 AM
Buldhana Name Change
---Advertisement---

Buldhana Name Change | महाराष्ट्रातील आणखी एका जिल्ह्याचे नाव बदलण्याची मागणी पुढे आली आहे. बुलढाणा (Buldhana) जिल्ह्याला ‘राजमाता जिजाऊनगर’ असे नाव देण्याची मागणी भाजपच्या (BJP) महिला आमदार श्वेता महाले (Shweta Mahale) यांनी केली आहे. यासाठी त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांना पत्र दिले असून, मुख्यमंत्र्यांनी या मागणीची दखल घेत प्रशासनाला पुढील कार्यवाही करण्याच्या सूचना दिल्याची माहिती आहे.

‘राजमाता जिजाऊनगर’ नाव देण्याची मागणी :

महाराष्ट्रात यापूर्वी तीन जिल्ह्यांच्या नामांतराचे निर्णय घेण्यात आले आहेत. औरंगाबादचे (Aurangabad) नाव छत्रपती संभाजीनगर, उस्मानाबादचे नाव धाराशिव (Dharashiv) आणि अहमदनगरचे (Ahmednagar) नाव अहिल्यानगर (Ahilyanagar) करण्यात आले आहे. आता याच धर्तीवर बुलढाणा जिल्ह्याचे नाव बदलावे, अशी मागणी श्वेता महाले यांनी केली आहे. राजमाता जिजाऊसाहेबांची जन्मभूमी असलेल्या सिंदखेड राजा (Sindkhed Raja) याच जिल्ह्यात येत असल्याने या भागाला त्यांचे नाव देणे योग्य ठरेल, अशी भूमिका आमदारांनी मांडली आहे.

मुख्यमंत्री फडणवीस यांना पाठवलेल्या निवेदनात बुलढाणा जिल्ह्याच्या ऐतिहासिक, धार्मिक आणि पर्यटनविषयक महत्त्वाचा उल्लेख करण्यात आला आहे. जगप्रसिद्ध लोणार सरोवर, संत गजानन महाराजांच्या (Gajanan Maharaj) पदस्पर्शाने पावन झालेले शेगाव (Shegaon), मेहकरमधील श्री शारंगधर बालाजी मंदिर, ज्ञानगंगा अभयारण्य आणि सैलानी बाबा दर्गा यांसारखी अनेक ठिकाणे जिल्ह्यात आहेत. या स्थळांमुळे देश-विदेशातून पर्यटक येथे येतात. त्यामुळे ‘राजमाता जिजाऊनगर’ हे नाव जगभर पोहोचण्यासही मदत होईल, असा दावा पत्रात करण्यात आला आहे.

Buldhana Name Change | जिजाऊंच्या योगदानाचा सन्मान करण्याचा दावा :

सिंदखेड राजा ही राजमाता जिजाऊसाहेबांची जन्मभूमी असल्याने बुलढाणा जिल्ह्यासाठीच नव्हे, तर संपूर्ण महाराष्ट्रासाठी ही अभिमानाची बाब असल्याचे आमदार श्वेता महाले यांनी म्हटले आहे. बाल शिवबांच्या मनात हिंदवी स्वराज्याची संकल्पना रुजवण्यात जिजाऊसाहेबांचे महत्त्वपूर्ण योगदान होते. त्यांच्या संस्कारातून छत्रपती शिवाजी महाराज यांच्यासारखा युगपुरुष घडला, असेही पत्रात नमूद करण्यात आले आहे. त्यामुळे त्यांच्या जन्मभूमीचा सन्मान करण्यासाठी जिल्ह्याचे नाव ‘राजमाता जिजाऊनगर’ करावे, अशी मागणी करण्यात आली आहे.

आपली ही मागणी महाले यांनी सोशल मीडियावरही शेअर केली आहे. राजमाता जिजाऊसाहेबांच्या जन्मभूमीचा गौरव आणि शिवप्रेमींच्या भावना लक्षात घेऊन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे निवेदनाद्वारे नामांतराची मागणी केल्याचे त्यांनी सांगितले. अहिल्यानगरच्या धर्तीवर बुलढाण्याचे नाव बदलण्याचा निर्णय घेतल्यास देशभरातील शिवप्रेमींना आनंद होईल, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली आहे.

News title : Buldhana Name Change Demand

Sonal.K

Sonal Kothimbire

Join WhatsApp Group

Join Now