Shivraj Motegaonkar | नीट (NEET) २०२६ मधील प्रश्नपत्रिका फुटीच्या प्रकरणात लातूर (Latur) येथील ‘आरसीसी’ कोचिंग क्लासेसचे संचालक शिवराज मोटेगावकर (Shivraj Motegaonkar) यांच्याविषयी दररोज नवनवीन आणि धक्कादायक खुलासे समोर येत आहेत. सीबीआयने (CBI) अटक केल्यानंतर न्यायालयाने त्यांना कोठडी सुनावली असून, तपास यंत्रणेच्या चौकशीत आता मोटेगावकरांच्या व्यावसायिक महत्त्वाकांक्षा आणि त्यांच्या कौटुंबिक योजनांची माहिती उघड होत आहे. स्वतः डॉक्टर नसलेल्या मोटेगावकरांनी आतापर्यंत आपल्या कोचिंग इन्स्टिट्यूटच्या माध्यमातून हजारो विद्यार्थ्यांना डॉक्टर बनवले; मात्र “मला स्वतःचे मेडिकल कॉलेज सुरू करायचे आहे,” अशी सुप्त इच्छा ते अनेकदा आपल्या वर्गातील विद्यार्थ्यांसमोर बोलून दाखवायचे, अशी माहिती आता समोर आली आहे.
मुलाच्या माध्यमातून ‘मेडिकल कॉलेज’चे स्वप्न साकारण्याचा डाव?
तपास यंत्रणेला संशय आहे की, शिवराज मोटेगावकर यांनी या वर्षीचा नीट परीक्षेचा पेपर प्रामुख्याने आपल्या मुलासाठीच लीक केला होता. त्यांच्या मुलाने याच वर्षी १२ वीची परीक्षा उत्तीर्ण केली असून त्याने नीटची परीक्षाही दिली आहे. मोटेगावकर आणि त्यांच्या पत्नी या दोघांपैकी कोणीही वैद्यकीय क्षेत्रातील (MBBS) पदवीधारक नाहीत. नियमांनुसार, जर एखाद्या व्यक्तीला स्वतःचे खाजगी वैद्यकीय महाविद्यालय किंवा मोठे रुग्णालय सुरू करायचे असेल, तर त्या कुटुंबातील किंवा संस्थेतील मुख्य व्यक्ती या क्षेत्रात सक्रिय आणि अनुभवी असणे आवश्यक मानले जाते.
याच कायदेशीर बाबीचा विचार करून, मुलाला कोणत्याही परिस्थितीत एमबीबीएस (MBBS) करून डॉक्टर बनवायचे आणि त्यानंतर त्याच्या नावावर लातूरमध्ये एक अवाढव्य हॉस्पिटल व मेडिकल कॉलेज उभे करायचे, अशी योजना मोटेगावकरांनी आखली होती अशी चर्चा राजकीय आणि शैक्षणिक वर्तुळात रंगली आहे. क्लासेसच्या व्यवसायातून कोट्यावधी रुपयांची संपत्ती कमावणारे मोटेगावकर हे सध्या अंमलबजावणी संचालनालयाच्या (ED) देखील रडारवर आले आहेत.
राजकीय जवळीक आणि ‘देशमुखांच्या नावाचे कुंकू’
शिवराज मोटेगावकर हे मूळचे लातूरचे असून त्यांचे मुख्य कोचिंग सेंटरही याच शहरात स्थिरावले आहे. त्यामुळे त्यांना आपले नियोजित मेडिकल कॉलेज लातूर जिल्ह्यातच सुरू करायचे होते. मात्र, २०१६ मधील एका जुन्या बॅचच्या विद्यार्थ्यांसमोर बोलताना मोटेगावकरांनी “लातूरमधील मातब्बर राजकीय नेतृत्व असलेले देशमुख कुटुंब आपल्याला यासाठी सहजासहजी साथ देणार नाही,” अशी भीती व्यक्त केली होती.
याच पार्श्वभूमीवर, वैद्यकीय महाविद्यालयाच्या मंजुरीसाठी आणि राजकीय पाठबळ मिळवण्यासाठी त्यांनी आपली रणनीती बदलल्याचे दिसून आले. २०२४ च्या विधानसभा निवडणुकीदरम्यान मोटेगावकर थेट काँग्रेस नेते अमित देशमुख (Amit Deshmukh) यांच्या प्रचार मंचावर सक्रिय झाले. त्या वेळी एका जाहीर सभेत “मी देशमुखांच्या नावाचे कुंकू लावले आहे,” असे वादग्रस्त वक्तव्य करून त्यांनी राजकीय जवळीक साधण्याचा प्रयत्न केला होता, ज्याचा मुख्य उद्देश मेडिकल कॉलेजच्या परवानगीचा मार्ग सुकर करणे हाच होता, असे बोलले जात आहे.
कोट्यावधींचे डोनेशन आणि उत्पन्नाचा नवीन स्त्रोत
मोटेगावकर हे तीव्र व्यावसायिक वृत्तीचे व्यक्ती म्हणून ओळखले जातात. त्यांनी खाजगी शिकवणीच्या क्षेत्रातून अफाट संपत्ती निर्माण केली आहे. महाराष्ट्रातील एकूण ८ प्रमुख आणि मोठ्या शहरांमध्ये त्यांच्या ‘आरसीसी’ क्लासेसचे जाळे पसरलेले आहे, ज्यामध्ये लातूर (मुख्य केंद्र), पुणे (हडपसर), नाशिक, अकोला, छत्रपती संभाजीनगर, नांदेड, सोलापूर आणि कोल्हापूर या शहरांचा समावेश आहे.
एवढ्या मोठ्या प्रमाणावर विद्यार्थ्यांचे जाळे पाठीशी असल्यामुळे, स्वतःचे खाजगी वैद्यकीय महाविद्यालय सुरू झाल्यास तिथून ‘डोनेशन’ (Donation) च्या नावाखाली कोट्यावधी रुपयांचा काळा पैसा आणि निधी गोळा करता येईल, तसेच उत्पन्नाचा एक कायमस्वरूपी मोठा स्त्रोत निर्माण होईल, असा त्यांचा अंदाज होता. उल्लेखनीय आहे की, यापूर्वीही मोटेगावकरांवर कर चुकवेगिरीचे (Tax Evasion) अनेक गंभीर आरोप झाले असून, आयकर विभागाने (Income Tax Department) त्यांच्या निवासस्थानावर आणि कोचिंग सेंटर्सवर छापे टाकून तपासणी केली होती. सध्या सीबीआय या सर्व आर्थिक पैलूंचा आणि त्यांच्या कौटुंबिक संबंधांचा बारकाईने तपास करत आहे.
News Title: Shivraj Motegaonkar Medical College Dream NEET Paper Leak






