Sanjay raut | आशिया कप 2025 मध्ये 14 सप्टेंबर रोजी अबुधाबी येथे भारत-पाकिस्तान क्रिकेट सामना होणार आहे. मात्र, पहलगाम दहशतवादी हल्ल्याच्या आठवणी ताज्या असतानाच होणाऱ्या या सामन्याला शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट) विरोध दर्शवणार आहे. पक्षाने या सामन्याच्या दिवशी महिला आघाडीकडून ‘माझं कुंकू-माझा देश’ आंदोलन छेडण्याचा निर्णय घेतला आहे. या आंदोलनाची घोषणा शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay raut) यांनी पत्रकार परिषदेत केली.
राऊतांनी थेट भाजपवर हल्लाबोल करत “एका बाजूला पाकिस्तानविरोधात ‘ऑपरेशन सिंदूर’ (operation sindoor) सुरू असल्याचं सरकार सांगतं, तर दुसऱ्या बाजूला अबुधाबीमध्ये पाकिस्तानसोबत क्रिकेट सामना खेळला जातोय. खून आणि क्रिकेट एकत्र कसे? यावर भाजप, संघ आणि विश्व हिंदू परिषद यांनी भूमिका स्पष्ट करावी,” असं आव्हान दिलं.
‘सिंदूर के सन्मान में, शिवसेना मैदान में’ :
संजय राऊत म्हणाले की, उद्धव ठाकरे (Uddhav thackeray) यांच्या अध्यक्षतेखालील बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. महिला आघाडी 14 सप्टेंबर रोजी रस्त्यावर उतरणार असून ‘सिंदूर के सन्मान में, शिवसेना मैदान में’ या घोषणेसह आंदोलन होणार आहे. (India Pakistan Match)
या आंदोलनात मोदींना सिंदूर पाठवण्याचे अभियानही राबवले जाणार आहे. “हा सामना म्हणजे देशद्रोह आहे. भाजपच्या नेत्यांची पोरं अबुधाबीला सामना बघायला जाणार आहेत, जय शाह क्रिकेटचे सर्वेसर्वा आहेत, आणि दुसरीकडे आम्हाला राष्ट्रभक्ती शिकवतात. आम्ही मूळ विचारापासून दूर गेलो नाही, हिंदुत्वाची खरी भूमिका आम्हीच घेतली आहे,” असा टोला त्यांनी भाजपला लगावला.
राऊतांनी ट्विट करतही सरकारवर निशाणा साधला. त्यांनी लिहिलं – “पहलगाव हल्ल्यात 26 मातांच्या आणि भगिनींच्या कुंकवाचा रंग पुसला गेला, तो आक्रोश आजही थांबलेला नाही. ऑपरेशन सिंदूर संपलेलं नाही. तरीही भारत-पाकिस्तान सामना खेळला जातोय. हा आमच्यासाठी असह्य आहे.”
Sanjay raut | बाळासाहेब ठाकरे यांची परंपरा आठवली :
संजय राऊत यांनी या प्रसंगी बाळासाहेब ठाकरेंची भूमिका आठवली. “बाळासाहेबांनी भारत-पाक (India Pakistan Match) सामन्याला कायम विरोध केला. जावेद मियांदाद घरी आला तेव्हा त्याला स्पष्ट सांगितलं की, चहा प्यायचा आणि निघून जायचं, क्रिकेटच्या वकिली करायची नाही. काश्मीरमध्ये रक्त सांडत असताना पाकिस्तानसोबत क्रिकेट कसं खेळता? यावर भाजप शांत आहे. तुम्ही हिंदुत्ववादी म्हणवता, मग विरोध का करत नाही?” असा सवाल राऊतांनी केला.
त्यांनी स्पष्ट केलं की शिवसेना हे सहन करणार नाही. “महिला रस्त्यावर उतरणार आणि आंदोलनातून भाजप सरकारला कठोर संदेश देणार,” असा इशारा राऊतांनी दिला. त्यामुळे भारत-पाक सामन्याबरोबरच आता मुंबईत होणाऱ्या या आंदोलनामुळे राजकीय तापमान चांगलंच वाढण्याची शक्यता आहे.






