Shivsena | राज्यातील महापालिका निवडणुकांनंतर महापौर आणि उपमहापौर पदासाठी हालचालींना वेग आला असताना शिवसेना (Shiv Sena) शिंदे गटात मोठी फूट पडल्याचे चित्र दिसत आहे. भाजप (BJP) सोबतच्या सत्तासमीकरणात महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या या गटाला छत्रपती संभाजीनगर (Chhatrapati Sambhajinagar) महापालिकेत अचानक बंडखोरीचा सामना करावा लागत आहे.
महापालिका निकालानंतर सत्तासमीकरण बदलतेय :
काही दिवसांपूर्वी राज्यात झालेल्या महापालिका निवडणुकांमध्ये भाजप सर्वात मोठा पक्ष ठरला. नगर परिषद आणि नगर पंचायत निवडणुकांप्रमाणेच याही निवडणुकीत भाजपने अनेक ठिकाणी आघाडी घेतली असली, तरी अनेक महापालिकांमध्ये त्यांना स्पष्ट बहुमत मिळाले नाही. त्यामुळे शिवसेना शिंदे गटासोबत केलेल्या युतीवर भाजपला अवलंबून राहावे लागत आहे. अनेक ठिकाणी भाजपकडे महापौरपद आणि शिवसेना शिंदे गटाकडे उपमहापौरपद राहण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
छत्रपती संभाजीनगरमध्येही अशीच स्थिती आहे. येथे भाजप सर्वात मोठा पक्ष ठरला असून एमआयएम (AIMIM) दुसऱ्या क्रमांकावर आहे. जरी भाजप आणि शिवसेना शिंदे गटाने निवडणूक स्वतंत्रपणे लढवली असली, तरी निकालानंतर शिंदे गटाने भाजपला पाठिंबा दिला आहे. त्यामुळे या महापालिकेत भाजपचा महापौर आणि शिवसेना शिंदे गटाचा उपमहापौर होणार असल्याचे चित्र होते.
Shivsena | उपमहापौर निवडीत बंडखोरी उफाळली :
मात्र उपमहापौरपदाच्या निवडीआधीच शिवसेना शिंदे गटात बंडखोरी उघड झाली आहे. पक्ष आदेश डावलून त्रिंबक तुपे (Trimbak Tupe), अनिता घोडले (Anita Ghodle) आणि हर्षदा शिरसाट (Harshada Shirsat) हे उपमहापौरपदासाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या तयारीत आहेत. तसेच जिल्हा परिषद मतदानानंतर मंत्री संजय शिरसाट (Sanjay Shirsat) यांच्यासह सर्व नगरसेवक उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांची भेट घेणार असल्याची माहिती आहे.
दुसरीकडे शिवसेना शिंदे गटाचे नेते राजेंद्र जंजाळ (Rajendra Janjal) यांनीही उपमहापौरपदासाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची घोषणा केली आहे. त्यामुळे 10 तारखेला होणाऱ्या महापौर आणि उपमहापौर निवडीत राजकीय समीकरणे नेमकी कोणत्या दिशेने वळतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. या संघर्षामुळे पक्षांतर्गत तणाव अधिक वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
नगरसेवकांची विभागणी आणि संभाव्य संघर्ष :
सध्याच्या परिस्थितीत त्रिंबक तुपे, अनिता घोडले, हर्षदा शिरसाट, सिद्धांत शिरसाट (Siddhant Shirsat), छाया वाघचौरे (Chhaya Waghchaure), श्वेता त्रिवेदी (Shweta Trivedi), किशोर नागरे (Kishor Nagare), अभिजित जीवनवाल (Abhijit Jivanwal), प्रेमलता दाभाडे (Premlata Dabhade) आणि राजू राजपूत (Raju Rajput) हे नगरसेवक मंत्री संजय शिरसाट यांच्या बाजूने उभे आहेत. तर ऋषिकेश जैस्वाल (Rishikesh Jaiswal) आणि यशोदा शेळके (Yashoda Shelke) हे राजेंद्र जंजाळ यांच्या समर्थनार्थ असल्याचे सांगितले जात आहे.
या पार्श्वभूमीवर छत्रपती संभाजीनगर महापालिकेत संजय शिरसाट विरुद्ध राजेंद्र जंजाळ असा राजकीय संघर्ष उभा राहण्याची शक्यता वाढली आहे. उपमहापौर पदासाठीची ही लढत केवळ स्थानिक राजकारणापुरती मर्यादित न राहता, शिंदे गटातील अंतर्गत समीकरणांवरही मोठा परिणाम घडवून आणू शकते.






