Shirish Maharaj More | संत तुकाराम महाराजांचे अकरावे वंशज ह.भ.प. शिरीष महाराज मोरे (Shirish Maharaj More) यांनी काल (. ५ फेब्रुवारी) देहू येथील राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. मंगळवारी रात्री ते जेवण करून झोपायला गेले, मात्र सकाळी त्यांनी दरवाजा न उघडल्याने कुटुंबीयांनी दरवाजा तोडला. तेव्हा त्यांनी उपरण्याच्या साहाय्याने गळफास घेतल्याचे दिसून आले. आर्थिक विवंचनेतून (Financial Crisis) त्यांनी हे टोकाचे पाऊल उचलल्याचे सुसाईड नोटमध्ये (Suicide Note) नमूद केले होते. अवघ्या वीस दिवसांपूर्वी त्यांचा साखरपुडा झाला होता आणि एप्रिल महिन्यात त्यांचा विवाह होणार होता. त्यांच्या या निर्णयामुळे कुटुंबीय आणि आप्तस्वकीयांना मोठा धक्का बसला आहे. दरम्यान, शिरीष महाराज मोरे यांनी कर्ज कशासाठी घेतले होते, याची माहिती समोर आली आहे.
कर्ज घेण्याची कारणे:
व्यवसायातील अपयश: कोरोना महामारीच्या आधी शिरीष महाराज मोरे यांनी व्यवसायात उतरण्याचा निर्णय घेतला. त्यांनी कागदी पिशवी बनवण्याचा आणि त्यावर छपाई करण्याचा व्यवसाय सुरू केला. यासाठी त्यांनी कर्ज घेतले होते. मात्र, कोरोना काळात हा व्यवसाय बंद पडल्याने त्यांना मोठे आर्थिक नुकसान झाले.
हॉटेल व्यवसायासाठी कर्ज: अडीच वर्षांपूर्वी त्यांनी हॉटेल व्यवसायात उतरण्याचा निर्णय घेतला. नादब्रह्म इडलीची फ्रँचायझी (Franchise) घेण्यासाठी त्यांनी काही लाख रुपये मोजले. पिंपरी-चिंचवड परिसरात त्यांनी हा नवीन व्यवसाय सुरू केला, जो आजही सुरू आहे. आधीचे कर्ज असतानाही त्यांनी या व्यवसायासाठी पुन्हा कर्ज घेतले. (Shirish Maharaj More)
घर बांधकामासाठी खर्च: काही महिन्यांपूर्वी त्यांनी एक मजली घर बांधले, ज्यासाठी त्यांना लाखांमध्ये खर्च आला.
चारचाकी गाडीसाठी कर्ज: अलीकडेच त्यांनी चारचाकी गाडी घेतली, त्यासाठीही त्यांना कर्ज घ्यावे लागले.
वारकरी संप्रदायात शोक
शिरीष महाराज मोरे यांनी जगाचा निरोप घेताना, “माझ्या मागे प्रत्येकाने दिलेले कर्ज फेडावे,” असे लिहून कोणावरही अन्याय होणार नाही, याची दक्षता घेतली. यातून त्यांनी जगद्गुरू संत तुकाराम महाराजांची परंपरा जपली, असे मोरे कुटुंबीयांचे म्हणणे आहे. मात्र, त्यांनी आर्थिक विवंचनेतून आत्महत्या केली, असे म्हणत चुकीची चर्चा घडवण्यात येत असल्याचेही कुटुंबीयांनी म्हटले आहे.
अनेकजण कीर्तनातून मोठे होत असताना, शिरीष महाराजांनी आजवर मोफत कीर्तनसेवा दिली. “फक्त यावेळी जरा गडबड झाली आणि दुःखाचा डोंगर वारकरी संप्रदायावर कोसळला. शिरीष महाराजांनी एकवेळ आवाज दिला असता तर अख्खा महाराष्ट्र मदतीला नक्कीच धावला असता,” अशी खंत देहूकरांनी व्यक्त केली आहे. दरम्यान, शिरीष महाराज यांनी आत्महत्येपूर्वी लिहिलेल्या चिठ्ठ्यांच्या आधारे देहूरोड पोलीस पुढील तपास करत आहेत. (Shirish Maharaj More)
Title : Shirish Maharaj More Suicide Reasons Behind Taking Loan Revealed






