MNS Morcha | मीरा-भाईंदर परिसरात सुरू असलेल्या मराठी विरुद्ध अमराठी वादाला आता अधिकच राजकीय वळण मिळाले आहे. मराठी भाषिकांसाठी आयोजित करण्यात आलेल्या मनसेच्या मोर्चाला पोलिसांनी परवानगी नाकारल्यानंतर राज्यात राजकीय खळबळ उडाली आहे. त्यातच महत्त्वाचे म्हणजे, शिंदे सरकारचेच मंत्री प्रताप सरनाईक (Pratap Sarnaik) यांनी मनसेच्या मोर्चात सहभागी होण्याची घोषणा केली आहे.
सरकारचा भाग असूनही मंत्री थेट मोर्चात सहभागी होत असल्याने शिंदे गटात अंतर्गत मतभेद उफाळून येण्याची शक्यता आहे. प्रताप सरनाईक यांनी पोलिसांच्या भूमिकेवर तीव्र टीका केली आहे आणि स्वतः मोर्चासाठी निघाल्याचे जाहीर केलं आहे. (MNS Morcha)
“हिम्मत असेल तर अटक करा!” – प्रताप सरनाईक यांचा पोलिसांना इशारा :
परिवहनमंत्री प्रताप सरनाईक (Pratap Sarnaik) यांनी ठाम शब्दांत पोलिसांवर नाराजी व्यक्त केली. “जर पोलिसांमध्ये हिंमत असेल, तर मला अटक करुन दाखवावी,” असे खुले आव्हानच त्यांनी दिले. त्यांनी म्हटले की, मराठी भाषिकांनी शांततेच्या मार्गाने मोर्चा काढण्याची विनंती केली होती, तरीसुद्धा पोलिसांनी अमान्यतेची भूमिका घेतली.
सरनाईक म्हणाले, “मी आमदार असूनदेखील माझ्या भागात पोलिसांनी मराठी कार्यकर्त्यांची धरपकड केली. हे कधीही खपवून घेतलं जाणार नाही. मी मुख्यमंत्र्यांकडेही या मुद्द्यावर नाराजी व्यक्त केली आहे. ही दडपशाही सहन केली जाणार नाही.”
MNS Morcha | “ही तर आणीबाणी” – अरविंद सावंतांचा सरकारवर घणाघात :
या संपूर्ण प्रकरणावर ठाकरे गटाचे खासदार अरविंद सावंत (Arvind Sawant) यांनी सरकारवर थेट टीका करताना ‘ही तर आणीबाणी आहे’ असे म्हटले. “हा मोर्चा पक्षाचा नव्हे, तर मराठी अस्तित्वाचा होता, त्याला विरोध म्हणजेच मराठी माणसाच्या हक्कावर गदा आहे,” असा गंभीर आरोप त्यांनी केला.
त्यांनी भाजपवरही जोरदार निशाणा साधला. “संविधानाच्या हत्या करणारे सत्ताधारी आहेत. महाराष्ट्रात निवडणुका होत नाहीत, यावरूनच स्पष्ट होतं की, लोकशाही धोक्यात आहे,” असे वक्तव्य करत त्यांनी भाजपवर आणि केंद्र सरकारवरही टीका केली.






